Ex MLA Rajeev Deshmukh
Ex MLA Rajeev Deshmukh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

‘मै झूकुंगा नही, चालीसगाव के विकास के लिये मै रुकुंगा नही...’

Sampat Devgire

चाळीसगाव : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) विशेषतः युवकांना नुकत्याच झालेल्या शरद युवा संवाद यात्रेतून जणू ‘बुस्टर डोस’ मिळाल्याचे दिसून आले. या मेळाव्याला तालुक्यातील (Chalisgaon) युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः माजी आमदार राजीव देशमुख (Rajeev Deshmekh) यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘मै झूकुंगा नही, चालीसगाव के विकास के लिये मै रुकुंगा नही...’ अशा फिल्मी स्टाईलने मारलेला ‘डायलॉग’ युवकांना भावल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे शरद युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने शहरातील आर. के. लॉन्सवर झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार राजीव देशमुख अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी मेहबूब शेख यांनी युवक संघटनेवर प्रकाशझोत टाकताना युवकांचे जास्तीत जास्त प्रश्‍न कसे सोडवता येतील यावर भर देऊन आपण केलेली कामे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, भाजपचे ‘ओबीसीं’विषयी असलेले प्रेम हे पुतणा मावशीचे आहे असे सांगून भाजपने मुंडे, खडसे, बावनकुळे, तावडे यासारखे ओबीसी नेते संपवल्याची टिका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जातीधर्मांना न्याय देणारा पक्ष आहे, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देताना शरद पवारांनी कुठल्याही परिणामाची तमा बाळगली नाही तसेच मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांना आमदार, खासदार नव्हे तर मंत्री केले व माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष केले असे सांगून युवकांना पक्ष संघटन आणखीन मजबूत करण्याचे आवाहन केले.

राजीव देशमुखांचे भाषण भावले

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार राजीव देशमुख यांनी आपली मणक्याची शस्रक्रिया झाल्याने काही लोकांना वाटते की मी आता थांबलो आहे. मात्र, आपल्या तालुक्याच्या विकासासाठी मी थांबणार नाही. आजारपणाच्या काळातही महविकास आघाडीच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे या तालुक्यात आणली असून त्याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन खुलासा करु असे सांगितले. श्री. देशमुख यांनी मार्गदर्शनपर बोलताना शस्त्रक्रियेमुळे मी थांबलो किंवा संपलेलो नाही असे सांगत ‘मै झूकुंगा नही, चालीसगाव के विकास के लिये मै रुकुंगा नही...’ असा फिल्मी स्टाईल डायलॉग मारताच उपस्थित तरुणांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवकांना पक्षाचे काम करण्याचे प्रेरणाच मिळाल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या भाषणानंतर उपस्थितीतांमधून व्यक्त झाल्या.

मेळाव्यात जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनीही मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले व शहराध्यक्ष शुभम पवार यांनी वर्षभराचा कार्य अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला. युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, अरुण अजबे, युवक प्रदेश चिटणीस किशोर पाटील, प्रवक्ते योगेश देसले यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT