Jalgaon News : कॉंक्रीट रस्ता कामाचे ८० लाखांचे बिल पास करुन देण्याच्या मोबदल्यात १८ लाखांच्या लाचेची मागणी करुन त्यातले पाच लाख रुपये स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा (PWD)अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे या शाखा अभियंत्याला दोन दिवसांपूर्वी एसीबीच्या पथकाने अटक केली होती.
याप्रकरणात आता तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली असून या प्रकरणात ठरलेल्या लाचखोरीच्या हिशेबात अभियंता अहिरेसोबत एक वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित वाॅर्डातील नगरसेविकेचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. नगरसेविकेला सहा टक्के दराने पैसे द्यायचे असल्याने अभियंत्याने अतिरिक्त लाचेची मागणी केली होती. त्या नगरसेविकेच्या मुलाचे नाव आशुतोष पाटील असून, त्यालाच ही रक्कम द्यावी लागणार होती. तपासात वरिष्ठ अधिकारी आणि नगसेविकापुत्राची चौकशी करण्यासाठीच न्यायालयाने लाचखोर अभियंत्यास पोलिस कोठडी सुनावली.
लाचखोर अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे याने एकुण १८ लाख रुपये मागितले होते. त्यात त्याने स्वतःसाठी ९ लाख, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ९ लाख मागितले होते. मात्र, वाॅर्डाच्या नगरसेविकेसाठी एकूण बिलाच्या सहा टक्के दराने लाच देण्यासाठी अहिरे दबाव आणत होता. ही रक्कम त्या नगरसेविकेचा पुत्र आशुतोष पाटील याला देण्याचे निश्चित झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात या बाबी रेकॉर्डवर घेतल्या असून, न्यायालयात सादर पुराव्यात त्याचा समावेश आहे.
जळगाव शहरातील वॉर्ड क्रंमाक १४ विनोबानगरात २०२४ मध्ये मंजूर कॉंक्रिट रस्ते बांधून पूर्ण झाल्यावर निधी नसल्याने कंत्राटदाराचे ८० लाख ३९ हजार ७४२ रुपयांचे बिल अडकले होते. त्यापैकी ५८ लाख रुपयांचे बिल मंजूर झाले, पैकी ४२ लाख रुपये ऑक्टोबर २०२५ मध्ये मिळाले. उर्वरित ३८ लाख ४९ लाख ७४२ रुपयांचे बिल प्रलंबित होते. ही बिले मंजूर करून देण्यासाठी कंत्राटदाराने शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आधीचे करून दिलेले काम अर्थात अदा झालेले बिल व उर्वरित ताजे बिल मंजुरीसाठी टक्केवारीनुसार १८ लाख रुपयांची मागणी केली.
संबंधित वॉर्डातील नगरसेविका यांना एकूण बिलाचे सहा टक्के रक्कम देण्यासाठी अभियंता अहिरे दबाव टाकत होता. वाजवीपेक्षा जास्तीची लाच मागून त्रास देत असल्याने तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून हा सापळा रचून योगेश अहिरे याला पाच लाखांची रोकड घेताना कारसह अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयिताला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.