Pune doctors arrested Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Illegal Sonography Racket : बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण तापलं; 'पुणे कनेक्शन'सह गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरांची संख्या पाचवर, एकूण 16 अटकेत

Shrirampur police Ahilyanagar arrested two Pune-based doctors and agent for allegedly supplying machines illegal sex determination racket, taking total arrests 16 : राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ इथल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात विनापरवाना सोनोग्राफी मशीन पुरविणाऱ्या 'पुणे कनेक्शन'चा अहिल्यानगरच्या श्रीरामपूर पोलिसांनी छडा लावला आहे.

Pradeep Pendhare

Illegal sex determination case Maharashtra : अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ इथल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोठा लिड घेतला आहे.

या रॅकेटला विनापरवाना सोनोग्राफी मशीन पुरविणाऱ्या 'पुणे कनेक्शन'चा पोलिसांनी छडा लावला असून, पुण्याच्या दोन डॉक्टरांसह एका एजंटाला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे या गुन्ह्यातील अटक आरोपींची एकूण संख्या आता 16 झाली असून, त्यात तब्बल 5 डॉक्टरांचा समावेश असल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नेवासा इथला डॉ. राहुल भणगे आणि एजंट प्रदीप ढगे या दोघांकडून जप्त करण्यात आलेली सोनोग्राफी मशीन्स पुणे (Pune) इथून खरेदी केल्याचे तपासात समोर आले होते. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन व अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुण्यात सापळा रचला.

या कारवाईत डॉ. आकाश सुभाष मलगुंडे (रा. शिरूर, पुणे), डॉ. नीलकंठ अशोक जाधव (रा. लोहगाव, पुणे) आणि नरेंद्र साहेबराव ठाकरे (रा. केसनांदगाव, हवेली, पुणे) या तिघांना मध्यरात्री ताब्यात घेऊन लोणी इथं आणून अटक करण्यात आली. न्यायालयाने (Court) या तिघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासात जप्त केलेली दोन्ही मशीन्स कुठेही अधिकृतपणे नोंदणीकृत नव्हती. आता पुणे इथल्या या डॉक्टरांनी ही प्रतिबंधित मशीन्स नेमकी कोठून आणली, या साखळीत आणखी किती डॉक्टरांना, अशी मशीन्स विकली गेली आहेत, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत. या अटकेमुळे राज्यव्यापी रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'मास्टरमाईंड' कोण

पुण्यातील आरोपींच्या अटकेनंतर आता तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभं राहिलं आहे. ही मशीन्स आयात केली जातात की, चोरीची आहेत? तसेच, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याबाहेरही ही साखळी पसरली आहे का? याचा तपास लोणी पोलिस करत आहेत. दिवसाला 10 महिलांची चाचणी करणाऱ्या या रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

गर्भपात गोळ्या पुरविणारा डॉक्टर गजाआड

बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाचा तपासात पोलिसांनी गर्भपातासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित गोळ्यांचा पुरवठा करणारा श्रीरामपूर इथला डॉ. राज अजीज शेख याला पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील काळे चेहरे एकामागून एक समोर येत आहेत. यापूर्वी IMAचा या प्रतिष्ठीत वैद्यकीय संघटनेचा माजी प्रदेशाध्यक्ष याला सुरवातीलाच अटक केली आहे.

आमदार ओगलेंचा प्रशासनाकडे पाठपुरावा

अनेक गावांमध्ये स्त्री जन्मदर 800च्या खाली येणे ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. जीव वाचविण्याऐजी डॉक्टरच हत्येचा व्यवसाय करत असतील, तर त्यांच्यावर हत्येचे गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. या रॅकेटची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पत्र पाठवून केली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना देखील पत्र पाठवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT