

Pimpri Nirmal sex determination case : अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपरी निर्मळ (ता. राहाता) इथं उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाला आता मोठे वळण मिळालं आहे. या रॅकेटमध्ये थेट ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे याचा सहभाग समोर आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
डॉ. कुटे याच्यासह दोन एजंट, यांना राहाता न्यायालयात हजर केले असता, या तिघांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. वैद्यकीय क्षेत्रातील एका जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्तीचे नाव अशा गंभीर गुन्ह्यात समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
निळवंडे कालव्यालगतच्या एका बंद खोलीत 10 हजार रुपये घेऊन गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती श्रीरामपूरचे (Shrirampur) अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. 29 एप्रिलला पोलिसांनी आरोग्य विभाग आणि पीसीपीएनडीटी पथकाच्या साहाय्याने या ठिकाणी छापा टाकला. प्रारंभी डॉ. राहुल भनगे आणि अभिजित भुसाळ या दोघांना पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह ताब्यात घेण्यात आले. या दोघांकडून सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू असताना पोलिसांनी (Police) प्रदीप भाऊसाहेब ढगे (वय 32, रा. कोऱ्हाळे) आणि निलेश ज्ञानेश्वर भवर (वय 42, रा. नपावाडी) या दोन एजंटांना शिताफीने अटक केली. चौकशीत या दोघांनी डॉ. रवींद्र कुटे याचे नाव सांगितले. हे एजंट गर्भवती महिला आणि डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून काम करत होते. विशेष म्हणजे, आरोपी प्रदीप ढगे याच्याकडे पोलिसांनी अधिक तपास केला असता, त्याच्याकडून लिंगनिदानासाठी वापरले जाणारे दुसरे मशीनही जप्त केले.
या रॅकेटची व्याप्ती केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित नसून याचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पुण्यातील काही बडे डॉक्टर आणि दलाल या साखळीचा भाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दिशेने पोलिसांचे एक पथक समांतर तपास करत आहे. केवळ डॉक्टर आणि एजंटच नव्हे, तर गर्भलिंग निदान करणाऱ्या महिलांच्या कुटुंबीयांनाही या गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्यात येत आहे.
राज्यातील ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. डॉ. कुटे हा आयएमएचे माजी प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या अटकेने वैद्यकीय वर्तुळात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. पोलिस कोठडी दरम्यान या रॅकेटमधील आणखी काही बडी नावे समोर येण्याची शक्यता आहे.
डॉ. रवींद्र कुटे हा 1987 पासून कन्सल्टिंग सर्जन (श्रीरामपूर). 2022-23 या वर्षासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेचे माजी अध्यक्ष होते. आयएमएच्या सदस्यता समितीचे अध्यक्ष, सीजीपी (कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स) महाराष्ट्रचे संचालक, 2015 मध्ये आयएमए एआयएस (अॅकेडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटीज) महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष.
2015च्या 'मस्तकॉन' अधिवेशनात त्यांना आयएमए महाराष्ट्र राज्य अध्यक्षांच्या हस्ते 'प्रशंसा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांना प्रोत्साहित करण्यात आणि आरोग्यविषयक जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी अत्यंत सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी आयएमएच्या माध्यमातून डॉक्टरांच्या हक्कासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणांसाठी विविध स्तरांवर काम केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.