Nashik Congress Latest Update : नाशिकमध्ये नुकतेच काँग्रेसचे १० दिवसांचे राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शिबिराच्या समारोपासाठी आणि पक्षाच्या ७८ जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वत: पक्षाचे नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर आले होते. 'संघटन सृजन अभियान' अंतर्गत त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला व संघटनात्मक रणनीतीवर मंथन केले.
राहुल गांधी यांनी दौऱ्यादरम्यान नाशिकमधील कार्यकारिणीत बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता नाशिक शहर काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघटन मजबूत करण्यासोबतच पक्षाला निवडणुकीसाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने या कार्यकारिणीत तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांचा समतोल साधण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व संघटक प्रशासन अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने ही घोषणा करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षांच्या मदतीसाठी उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव आणि समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहर काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत नगरसेवक सुफीयान जीन यांच्यासह एकुण सहा जणांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शशीकांत शिंदे यांच्याकडे कोषाध्यक्षपद, तर १७ सरचिटणीस, १७ सचिव आणि ८ संघटक सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हास सातभाई यांची समन्वयकपदी निवड झाली आहे.
याशिवाय शहर कॉंग्रेसच्या नव्या रचनेत पक्षातील जेष्ठ व अनुभवी नेत्यांना देखील स्थान देण्यात आलं आहे. २० ज्येष्ठ नेत्यांची विशेष निमंत्रितपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. यामध्ये, खासदार डॉ. शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, दिनेश बच्छाव, राजेंद्र बागूल, ज्ञानेश्वर गायकवाड, अॅड. आकाश छाजेड, डॉ. सुभाष देसले, केशव पाटील, लक्ष्मण जायभावे, बाळासाहेब गामणे, मंगेश लहामगे, डॉ. सुचिता बच्छाव, सोहेल बेग आणि रवींद्र टवकर यांच्यासह एकूण २० जणांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती झाली आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेता तरुण आणि आक्रमक चेहऱ्यांना संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात, आल्या आहेत. शहरातील विविध भागांसह समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नेत्यांना विशेष निमंत्रित म्हणून स्थान देत त्यांच्या अनुभवाचा संघटनात्मक कामासाठी उपयोग करून घेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. पक्षांतर्गत समन्वय वाढवणे आणि शहरातील जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे, ही नव्या टीमसमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.