Ahilyanagar Child Marriage : राज्य सरकारकडून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.
या प्रकरणी राहुरी पोलिसांनी पती, सासरचे नातेवाईक, विवाह जुळवून देणारा मध्यस्थ आणि दोन्ही कुटुंबांतील संबंधित व्यक्तींसह एकूण 13 जणांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर (Ahilyanagar) शहराजवळील नागापूर परिसरातील 15 वर्षीय मुलीचा विवाह 7 मे रोजी राहुरी तालुक्यातील राजवाडा परिसरातील एका तरुणाशी लावण्यात आला. फिर्यादीनुसार, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती संबंधितांना असतानाही तिच्या आईसह मध्यस्थ आणि दोन्ही कुटुंबीयांनी विवाह लावून दिला.
तक्रारीनुसार, विवाहानंतर सासरी राहत असताना मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तिने आईशी संपर्क साधला. 29 मे रोजी आईने तिला माहेरी आणल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या 'उडान' प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी मुलीच्या वयाची पडताळणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मुलीने 17 जुलै रोजी राहुरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पती, सासू, नणंद, विवाह जुळवून देणारा मध्यस्थ आणि इतर संबंधित अशा 13 जणांविरुद्ध POCSO कायदा तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तुळशीदास गिते करत आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने यापूर्वी "बालविवाह मुक्त भारत" अभियानांतर्गत बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती आणि समन्वयात्मक उपाययोजना राबवल्याची माहिती दिली होती. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र बालविवाह रोखण्यात देशात आघाडीवर असल्याचा दावा केला होता.
त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासनाने हस्तक्षेप करून अनेक बालविवाह रोखल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुकही करण्यात आले होते. अशा पार्श्वभूमीवर राहुरीतील हे प्रकरण पुन्हा एकदा बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा मुद्दा अधोरेखित करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.