Ahmednagar News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : रेल्वे मालधक्क्यावरील 578 माथाडी कामगारांच्या लढ्याला यश; काँग्रेस नेत्याने केला जल्लोष

Pradeep Pendhare

Ahmednagar Latest News : अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने, धरणे, मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे 578 कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष सुरू होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये 1 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीतील थकीत वेतन वसुलीच्या 40 टक्के तर मे 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीतील उर्वरित 60 टक्के रक्कम तात्काळ कोर्टात भरण्याचे निर्देश ठेकेदारांना दिले आहेत.

25 जानेवारी 2024 पूर्वी ही रक्कम भरण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला असल्याची माहिती अहमदनगर माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी दिली आहे. यामुळे ठेकेदारांना चांगलीच चपराक बसली आहे.

न्यायालयाच्या या आदेशाची प्रत काँग्रेसच्या वतीने जारी करण्यात आली आहे. आदेशाची प्रत मिळताच काळे, उबाळे, भिंगारदिवे यांच्या उपस्थितीमध्ये कामगारांनी जोरदार जल्लोष केला. फटाकड्यांची आतिषबाजी करण्यात आली. गुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला.

15 डिसेंबर रोजी शहर काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीने महसूल विभाग, माथाडी मंडळाच्या विरोधात महिला मुलांसह रस्त्यावर उतरत बाजारपेठेतून भव्य कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी व्यापारी, कामगारांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर 19 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाच्या वतीने कामगारांची बाजू ॲड. शरद नातू यांनी जोरदारपणे मांडली. ठेकेदारांचेही म्हणणे कोर्टाने समजून घेतले. त्यानंतर कोर्टाने माथाडी कामगारांना दिलासा देणारा मोठा निर्णय दिला आहे.

किरण काळे म्हणाले, 'हा कामगार एकजुटीचा विजय आहे. कामगारांची व्यथा सरकारी पक्षाकडून न्यायालयामध्ये यापूर्वी ताकदीने मांडली जात नव्हती. मात्र काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उबाळे, भिंगारदिवे यांच्या पुढाकारातून छेडण्यात आलेली तीव्र आंदोलने, निवेदने, सातत्यपूर्ण पाठपुरावा, मोर्चा याची दखल महसूल विभाग, माथाडी मंडळाला अखेर घ्यावी लागली. त्यामुळेच कोर्टासमोर यापूर्वी कधी न मांडलेले कामगार हिताचे महत्त्वपूर्ण मुद्दे यावेळी सरकारी पक्षाने जबाबदारीने मांडले'. त्यामुळेच न्या. रवींद्र घुगे, न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठाने कामगारांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाचे काँग्रेस व कामगारांच्यावतीने स्वागत करतो, असे काळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकाल कामगारांच्या बाजूने लागू नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. मात्र, भगवान के घर देर है, अंधेर नही. कामगार हा कष्टकरी आहे. त्याच्या घामाचे दाम त्याला मिळणे हा त्याचा अधिकार आहे, असे विलास उबाळे यांनी सांगितले.

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, किरण काळे यांनी कामगारांच्या मागे ताकद उभी केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने 12 जानेवारीपर्यंत माथाडी मंडळाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. या माध्यमातून कामगारांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी मंडळासमवेत काँग्रेस कामगार शिष्टमंडळ लवकरच बैठक करेल. पहिल्या टप्प्यातील उर्वरित 60 टक्के व दुसरा 40 टक्के वेतनाचा फरक देखील कामगारांना मिळवून देण्यासाठी काँग्रेस भक्कमपणे लढा देईल, असे सांगितले.

Edited by Sachin Fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT