Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MNS Marathi Politics : सुस्त मनसेला नाशिकमध्ये मिळाला मराठीचा मुद्दा!

Sampat Devgire

Raj Thackeray Politics : बाजारपेठेसह शहरातील संस्था व दुकानांवर मराठी फलक लावा, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलनाला तयार राहा, असा इशारा आज देण्यात आला. मुंबई, पुण्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहरातदेखील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. त्यासाठी आज फलकांना काळे फासत आंदोलन करण्यात आले. (MNS warns Shop owners on Marathi boards on shop in the city)

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षातर्फे आज नाशिकमध्ये (Nashik) मराठी पाट्यांचा मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत फलकांना काळे फासत आंदोलन केले.

यासंदर्भात आज सकाळी शहरातील कॉलेज रोड भागात मोठ्या संख्येने जमलेल्या मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या खळ्ळ खट्याक स्टाइलने यावर तोडगा काढील. त्याला व्यापारी वर्गाने तयार राहावे, असा इशारा देण्यात आला.

यासंदर्भात माजी महापौर अशोक मुर्तडक म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरात बहुतांश दुकानांवर इंग्रजी भाषेत फलक आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत आहे. त्याबाबत दुकानदार तसेच उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. येत्या आठवडाभरात इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावाव्यात, अन्यथा मनसे पुन्हा आंदोलन करील, असा इशारा दिला.

यासंदर्भात मनसेच्या वतीने निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे. ''अन्य राज्यात व्यापारी व दुकानदार स्वतःहून स्थानिक भाषेतील फलक लावतात. त्यामुळे या विषयावर सक्ती करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. त्यांनी तातडीने मराठी पाट्या लावाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक भाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, मनसे कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष सलिम मामा शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाताई डेरे, मनोज घोडके, नामदेव पाटील, अमित गांगुर्डे, संजय देवरे, मिलिंद कांबळे उपशहराध्यक्ष सचिन सिन्हा, संतोष कोरडे, विजय आहेरे आदींसह मोठ्या संख्येने नेते तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT