Nashik Political News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. नाशिक शहर यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्याने २००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्र दिले होते. हे पत्र दिल्यावर ते तडक नाशिकला निघून आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ९ मार्च २००६ या दिवशी शिवाजी पार्क येथे मेळावा घेऊन स्थापन झाला. मात्र हा पक्ष स्थापन करण्याच्या प्रक्रियेत राज ठाकरे यांना नाशिकची मोठी साथ होती. मनसे आणि नाशिक हे एक वेगळे रसायन तयार झाले होते.
राज ठाकरे यांना मुंबई शहराऐवजी नाशिकची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडत असल्याचे पत्र बाळासाहेब ठाकरे यांना दिले. त्यानंतर सायंकाळी ते नाशिकला पोहोचले. हॉटेल पंचवटी येथे त्यांचा मुक्काम होता. या दरम्यान दिवसभर हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यामुळे माध्यमांचा या हॉटेलला गराडा पडला होता.
राज ठाकरे नाशिकला होते, मात्र त्यांच्या मनात काय आहे याची कल्पना शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना नव्हती. दिवसभर विविध चर्चा झाल्याने अनेक महत्त्वाचे पदाधिकारी राज ठाकरे यांना भेटण्यास टाळले. माजी महापौर वसंत गीते यांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा 'सकाळी या' एवढ्यात निरोप त्यांना होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी राज ठाकरे थेट शिर्डीला जाण्यास निघाले. यावेळी त्यांच्यासमवेत नाशिकच्या कार्यकर्त्यांच्या चाळीसहून अधिक गाड्या होत्या. त्यामध्ये माजी महापौर वसंत गीते हे प्रमुख होते. चाळीसहून अधिक गाड्या घेऊन त्यांचे समर्थक शिर्डीच्या प्रवासात राज ठाकरे यांची साथ करीत होते. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना राज ठाकरे नेमके काय करणार याबाबत त्यांच्या निकटवर्ती यांनाही कोणतीही कल्पना नव्हती, हे विशेष.
शिर्डी येथे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे मुंबईला निघून गेले. नंतर तीन महिन्यांनी त्यांनी मनसेची स्थापना केली. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला १२ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मात्र नाशिकमध्ये मनसे रुजावी यासाठी माजी महापौर वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर संपर्क मोहीम राबविण्यात आली.
राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता आणि छगन भुजबळ पालकमंत्री अशी स्थिती होती. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री छगन भुजबळ विरुद्ध माजी महापौर वसंत गीते अशी स्थानिक पातळीवर लढाई होती. त्यात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला नाशिककरांनी पसंती दिल्याने महापालिकेत ४० नगरसेवक विजयी झाले. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या मदतीने महापालिका सत्तेत आले.
महापालिकेत ॲड यतीन वाघ मनसेचे पहिले महापौर झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही जागा मनसेला मिळाल्या. वसंत गिते, अॅड उत्तमराव ढिकले आणि नितीन भोसले हे तीघे आमदार झाले. राज्यात मनसेचे १२ आमदार निवडून आले. नाशिकचे वसंत गीते विधिमंडळाचे उपनेते झाले.
महापालिकेत सत्ता आल्यानंतर राज ठाकरे यांनी सीएसआर फंडातून केलेला शहराचा विकास सगळ्यांच्या लक्षात राहिला. आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग द्वारे त्यांनी अनेक दूरगामी प्रयोग केले. शहरातील चौकांचे आणि उड्डाणपुलाच्या खाली केलेले सुशोभीकरण, पांडवलेणीच्या पायथ्याशी बोटॅनिकल गार्डन, लेझर शो असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानेच राज ठाकरे बाहेर पडले होते. आता पुन्हा राजकारणाने कुस बदलली आहे. त्यात देखील नाशिकचे काय योगदान राहील याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.