Bala Nandgaonkar at MNS meeting
Bala Nandgaonkar at MNS meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेचे आमदार फुटत होते तेव्हा वेदना होत होत्या!

Sampat Devgire

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) हेच खरे हिंदुत्वाचे वारसदार आहे. मनसेच्या हिंदुत्वात मुस्लिमदेखील सहभागी आहेत. हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर अनेकांना भीती वाटली, असा दावा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केला. (MNS leader Bala Nandgaokar said we build Shivsena)

मनसेच्या नाशिक येथील राजगड कार्यालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन परशुराम साईखेडकर नाट्यगृहात करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, की राज्यात जे नाट्यंतर घडले ते घडत असताना शिवसेनेचे आमदार फुटत होते. त्यातून आनंद नव्हता, तर वेदना होत होत्या. त्याला कारण म्हणजे शिवसेना आम्ही उभी केली. अशा पद्धतीने शिवसेना फुटत असताना दुःख होत होते. मनसेची स्थापना झाली त्या वेळेस इतर पक्ष फोडायचे नाही, ही आमची भूमिका होती. हे तत्त्व आम्ही आजही पाळले. कोणाचा पक्ष फोडला नाही. नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोमणा मारला.

(कै) आनंद दिघे यांच्या निधनानंतर रघुनाथ मोरे ठाण्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष झाले; परंतु दुर्दैवाने काही दिवसातच त्यांचा अपघात झाला. त्या वेळी मी शिवसेनेचा संपर्क नेता होतो. राजन विचारे, रवींद्र फाटक, नरेश म्हस्के व एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाला जिल्हाध्यक्ष करायचे, असा निर्णय घ्यायचा होता. एकनाथ शिंदे यांना एक कार्यकर्ता घेऊन आला. त्यांनी शिंदे यांना जिल्हाध्यक्ष व्हायचे आहे, असे सांगितले. शिंदे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद त्या वेळी मी सोपवले होते. त्या वेळी शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी केलेली निवड चुकली नाही, हे आज मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा दावा नांदगावकर यांनी केला.

मनसेचे प्रदेश प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, एकदा यश मिळाल्यानंतर कार्यकर्ते स्वस्थ होतात. कायम प्रयत्न केल्यास यश टिकून राहाते. नाशिकच्या यशाबाबत हेच झाले. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन पत्र वाटपाचे आवाहन केले होते, मात्र नाशिकमधून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माझे नगरसेवक सलीम शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. समन्वयक सचिन भोसले, ॲड. रतनकुमार इचम, श्याम गोहाड, पराग शिंत्रे, विक्रम कदम, सुजाता डेरे, मनोज घोडके, नंदिनी बोडके, प्रमोद साखरे, नितीन साळवे, अर्चना जाधव, कामिनी दोंदे, सत्यम खंडाळे, अक्षय खांडरे आदी उपस्थित होते.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT