Rajabhau waje sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje News : राजाभाऊ वाजे ॲक्टिव्ह; म्हणाले, 'जरांगे पाटलांचे उपोषण सोडवा'

Manoj Jarange Patil : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार वाजे यांनी थेट राज्यपालांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी त्यात हस्तक्षेप करावा. राज्य शासनाला हा प्रश्न सोडविण्याची सूचना करावी.

Sampat Devgire

Nashik News: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विविध लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही आता यामध्ये उडी घेतली आहे. यासंदर्भात खासदार वाजे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील ८ जूनपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उपोषण करीत आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे हा संबंध महाराष्ट्रासाठी काळजीचा विषय असल्याचे राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी म्हटले आहे.

खासदार वाजे म्हणाले, राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची गरज आहे. मात्र, राज्य शासन तशी पावले टाकताना दिसत नाही. त्यामुळे राज्यपालांनी त्यात हस्तक्षेप करावा. राज्य शासनाला हा प्रश्न सोडविण्याची सूचना करावी.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील प्रमुख मुद्दा होता. अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. मतदारांमध्ये तो एक प्रमुख मुद्दा असल्याने सध्या राज्यातील विविध लोकप्रतिनिधी जरांगे पाटील यांना उघड पाठिंबा व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यातील पहिले लोकप्रतिनिधी

या संदर्भात आता नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींना सक्रिय होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर खासदार वाजे हे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे जिल्ह्यातील पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत.

SCROLL FOR NEXT