Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje : सायंकाळच्या लोडशेडिंगमुळे होणारे शेतकऱ्यांचे हाल थांबवा ; खासदार राजाभाऊ वाजे आक्रमक

Nashik Load Shedding : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने खासदार राजाभाऊ वाजे आक्रमक झाले.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळेत होत असलेल्या वीज खंडितीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता अनिल थोरात आणि कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी खासदार वाजे यांनी सायंकाळच्या वेळेत होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेती, दुग्धव्यवसाय, पिण्याचा पाणीपुरवठा तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असलेल्या परिणामाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतीपंपांसाठी वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात शेतात जावे लागते. त्यामुळे बिबट्या व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच अनेक गावांमध्ये नवीन फीडर उभारणी, कृषी फीडर विभक्तीकरण, क्षमतेत वाढ, डीपी व इतर विद्युत पायाभूत सुविधांची कामे मंजूर असूनही ती संथ गतीने सुरू असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. ही सर्व प्रलंबित व रेंगाळलेली कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेण्याचे तसेच आवश्यक तेथे तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही खासदार वाजे यांनी दिले. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत होणारे लोडशेडिंग कमी करण्यासाठी आणि नागरिकांना पूर्वकल्पना देऊनच वीजपुरवठा खंडित करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांची नोंद घेऊन प्रलंबित फीडरची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

शेतकऱ्याला सुरक्षित, अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेशी आणि शेतीच्या उत्पादनाशी संबंधित प्रश्नांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. महावितरणने तातडीने ठोस उपाययोजना करून ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा असे निर्देश खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT