New Delhi Politics: जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी शिवजयंती बुधवारी उत्साहात साजरी झाली. यामध्ये चर्चेचा विषय ठरली ती भारतीय संसदेच्या आवारातील शिवजयंती. त्याला कारणही तसेच ठरले आहे.
देशाच्या राजधानीत अलीकडे पर्यंत शिवजयंती उत्सव साजरा होत नव्हता. महाराष्ट्र सदनात लहान स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात येत असे. सध्या मात्र संसदेच्या आवारासह नवीन महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात साजरी होऊ लागली आहे.
यानिमित्ताने सर्व मराठी खासदार एकत्र आले होते. विशेषतः ज्यांच्या एकत्र येण्याकडे संशयाने पाहिले जाते, त्या शिवसेना शिंदे पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदारही अतिशय उत्साहाने एकत्र आलेले दिसले. संसदेच्या आवारात खासदारांनी शिवजयंती साजरी केली.
नवीन महाराष्ट्र सदनात छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकाराने शिवजयंती साजरी होत असते. छत्रपती संभाजीराजे आणि कुटुंबीयांनी नवीन महाराष्ट्र सदनामध्ये पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली. यावेळी संयोगिता राजे यांनी पाळणा पूजन केले. यामध्ये नाशिकच्या ढोल पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ ढोल वाजवून त्यांना आदरांजली वाहिली.
दिल्लीच्या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे २००५ मध्ये (कै) मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असताना आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना संसदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. २०१५ मध्ये नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह मराठी लोकांना एकत्र करून संसदेच्या आवारात शिवजयंती उत्सव सुरू केला.
नवी दिल्लीत संसदेच्या आवारातील ही परंपरा अद्याप पर्यंत सुरू आहे. यानिमित्ताने काल माजी खासदार गोडसे आणि खासदार राजाभाऊ वाजे हे देखील एकत्र आलेले दिसले. या दोघांनीही एकमेकांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अनेकांना एक वेगळे आणि दिलासादायक राजकारण पाहायला मिळाले.
यावेळी खासदार वाजे यांनी संसदेच्या आवारातील शिवजयंती उत्सव सुरू ठेवण्यासाठी पुढाकार आणि सहभाग घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे एकनाथ शिंदे पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांची एक परंपरा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार वाजे पुढे सुरू ठेवणार आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला. यावेळी शिवसेनेचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.