Dada Bhuse News: नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्याला आता दीड महिना पूर्ण होत आला आहे. मात्र अद्यापही यावर तिन्ही पक्षांचे समाधान होईल, असा तोडगा निघू शकलेला नाही.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मनातील भावना अखेर ओठांवर आलीच. त्यामुळे अनेकांना पडलेला प्रश्न अखेर सुटला. मंत्री भुसे यांनी मला देखील नाशिकचे पालकमंत्री होण्याची इच्छा आहे. अशी इच्छा असल्यास गैर काहीच नाही, असे म्हणाले.
नाशिकच्या पालकमंत्री पदी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली होती. रायगडच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने पालकमंत्री पदासाठी दावा केला होता.
विशेषतः रायगड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अधिक आहेत. त्यामुळे भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी इच्छुक मानले जात होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने कुरघोडी करीत अदिती तटकरे यांची शिफारस केल्याने महायुतीतील पक्षांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला.
एकनाथ शिंदे पक्षाला नाशिक आणि रायगड या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री म्हणून नियुक्ती अपेक्षित होती. नाशिकसाठी दादा भुसे यांचे नाव चर्चेत होते. मात्र आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने दूरदृष्टीने येथे गिरीश महाजन यांचे नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे शिवसेना शिंदे पक्ष चांगलाच बिथरला होता. त्यामुळे मुख्यमंत्री परदेशात असतानाही त्यांनी या दोन्ही नियुक्ती त्यांना स्थगिती दिली.
आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष कोणतीही राजकीय तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही. मंत्री भुसे यांनी त्यामुळेच नाशिकचे पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा उपमुख्यमंत्री शिंदे पूर्ण करू शकतील का? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील नियुक्तीचा हा पेच असल्याने त्यात राजकीय ताळमेळ आणि समतोल दोन्ही साधावा लागणार आहे.
त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे. त्यात भाजप नाशिकसाठी माघार घेईल असे सध्याचे चित्र नाही. नाशिकला भाजपचा दावा पक्का करण्यासाठी रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाला झुकते माप देण्याची रणनीती असल्याचे बोलले जाते. त्यामुळे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची ससेहोलपट होण्याची चिन्हे आहेत.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.