Shivsena Shinde News: शिवसेना शिंदे पक्षाचा एबी फॉर्म राजश्री अहिराव यांना दिला होता. त्यानंतर या उमेदवारांना माघारीच्या सूचना देण्यात आल्या. मात्र अहिरराव यांनी हा डाव पक्षावरच उलटवला आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .यांची विश्वासार्हताच संकटात आली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार धनराज महाले (दिंडोरी) आणि राजश्री अहिरराव (देवळाली) यांना एबी फॉर्म दिला होता. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्तरावर स्तरावर झालेल्या चर्चेनंतर या दोन्ही उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. माजी आमदार धनराज महाले यांनी माघार घेतली. मात्र देवळालीच्या राजश्री अहिरराव दिवसभर नॉट रिचेबल होत्या.
या संदर्भात प्रसारमाध्यमे आणि दैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बातम्या आणि चर्चा होत्या. मात्र आज प्रकट झालेल्या राजश्री अहिरराव यांनी या सर्व बातम्या विषयी अनभिज्ञता व्यक्त करीत सगळ्यांना धक्का दिला. एव्हढेच नव्हे तर पक्षाने माघार घेण्याचा आदेश दिलाच नव्हता, असे सांगत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धर्म संकटात टाकले आहे.
श्रीमती अहिरराव आज `साम` वाहिनीवर प्रकट झाल्या. यावेळी त्यांनी मी देवदर्शनाला गेले होते. त्यामुळे कदाचित फोन लागला नसावा. मात्र पक्षाने मला माघार घेण्यासंदर्भात कोणतेही आदेश दिले नव्हते, असे सांगितले.
त्या म्हणाल्या, काल काय घडले याची मला काहीही माहिती नाही. उलट मी आजपासून महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहे.महायुतीचे सर्व पदाधिकारी माझा प्रचार करतील, असे त्यांनी सांगितले.
श्रीमती अहिरराव या स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या तहसीलदार आहेत. त्यांना नियम आणि कायदे यांची चांगलीच माहिती आहे. अशा स्थितीत त्यांनी केलेली ही विधाने सुचक आहेत. हा त्यांनी केलेला सोयीचा बनाव आहे की, शिवसेना शिंदे पक्षाने महायुतीच्याच उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी टाकलेला डाव असा संभ्रम यातून निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल पक्षाने राजश्री अहिरराव यांचा एबी फॉर्म रद्द करावा आणि त्यांना पक्षाचा उमेदवार मानू नये असे लिखित पत्र दिले होते. असे असताना अहिरराव यांनी असे काही घडल्याचे माहितच नाही, असे विधान करणे धक्कादायक मानले जाते.
श्री अहिरराव एवढ्यावरच न थांबता आपण आता प्रचाराला सुरुवात करणार आहोत. महायुतीतील घटक पक्ष आपल्याला मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवळाली मतदारसंघात महायुतीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे या उमेदवार आहेत. असे असताना श्रीमती अहिरराव यांनी केलेला दावा शिवसेना शिंदे पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री शिंदे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहेत. त्यामुळे आता शिवसेना शिंदे पक्ष अडचणीत येतो की राजश्री अहिरराव यांच्यावर कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.