Raksha Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadse : रक्षा खडसे आल्या अन् आमदार सीमा हिरे यांचं टेन्शन वाढवून गेल्या?

Raksha Khadse at Nashik BJP Meeting : 'कोणीही मलाच उमेदवारी मिळेल असा दावा करू नये. कारण उमेदवारी कोणाला द्यायची याचे...' असंही रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे.

Sampat Devgire

Raksha Khadse and MLA Seema Hire News: महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबतच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनाही भाजपने नाशिक जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. यानंतर रक्षा खडसे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.

केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी जिल्ह्याच्या निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक घेतली. नाशिक पश्चिम मतदार संघाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार संदर्भात तक्रारींचा पाढा वाचला.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच असंख्य तक्रारी केल्या. त्यामुळे राज्यमंत्री रक्षा खडसे(Raksha Khadse) यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आल्याचे दिसून आले. यातील बहुतांशी तक्रारी शासनातील मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बाबतच्या होत्या.

अखेर राज्यमंत्री खडसे यांनी या कार्यकर्त्यांच्या भाषणात हस्तक्षेप केला. तक्रारीचे निवारण करणे हे फक्त लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचेच काम नाही. कार्यकर्त्यांनी देखील तक्रारींचे निवारण केले पाहिजे. सत्ता आपली आहे. याचाच अर्थ लोकांची कामे करण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. या शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला.

या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडे(BJP) सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. १५ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यातील काही पदाधिकारी माझे वरिष्ठांची संबंध आहेत. मला उमेदवारीचा शब्द मिळाला आहे. उमेदवारी मलाच मिळणार आहे. अशी विधाने करीत असतात.

विद्यमान आमदार म्हणून सीमा हिरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मतदार संघातील त्यांचा संपर्क आणि संघटनात्मक बांधणी यामुळे त्यांचे समर्थक उमेदवारी बाबत निर्धास्त आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री खडसे यांनी या सर्व इच्छुकांसह तक्रार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही चांगलेच खडसावले. उमेदवारी कोणाला मिळणार हा निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. पक्ष पातळीवर त्याचा निर्णय होईल. कोणीही मलाच उमेदवारी मिळेल असा दावा करू नये. कारण उमेदवारी कोणाला द्यायची याचे काही निकष आहेत. त्यानुसार उमेदवारी ठरेल.

यावेळी राज्यमंत्री खडसे यांनी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सरकारने केलेल्या उल्लेखनीय कामांचा आढावा घेतला. लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारला मोठे यश मिळवून देईल. त्यामुळे प्रत्येकाने लाडकी बहीण योजनेची यादी तयार करावी.बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी खास कष्ट घ्यावेत. प्रत्येक घरात जाऊन लाडकी बहीण योजनेची माहिती द्यावी. पद आज असेल उद्या नसेल. मात्र कार्यकर्ता हे पद सर्वात मोठे आहे. कार्यकर्त्यांनाच पक्षात भविष्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री खडसे यांच्या कानपिचक्यांनी सगळेच इच्छुक एकदमच गार झाले. यातील सर्व इच्छुकांनी शांत राहणेच पसंत केले. खडसे यांनी उमेदवारी कोणाला मिळणार, यावर सगळ्यांनाच इशारा देणारे वक्तव्य केले. त्यामुळे आजच्या बैठकीचे वर्णन तरी राज्यमंत्री खडसे आल्या आणि उमेदवारी बाबत विद्यमान आमदार सीमा हिरे यांची चिंता वाढवून गेल्या, असेच म्हणता येईल.

यावेळी आमदार हिरे, प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, दिनकर पाटील, महेश हिरे, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, जगन पाटील यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी नाशिक पश्चिम मतदार संघातील राजकीय स्थिती आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाविषयी माहिती दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT