Raver News: रावेर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
रावेर मतदारसंघात महायुतीने भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्याबाबत भारतीय जनता पक्षात दोन मतप्रवाह होते. प्रारंभी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असे संकेत दिले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात खडसे उमेदवार नसल्यास गिरीश महाजन यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात शरद पवार यांनी एकनाथ खडसे उमेदवार असतील असे स्पष्ट केले होते. एकनाथ खडसे यांनीदेखील निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली होती. रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळणार नाही, या अपेक्षेने ही सर्व तयारी होती. मात्र, खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यावर खडसे कुटुंबात राजकीय संघर्ष होणार होता. तो टाळण्यासाठी एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण देऊन उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे रावेरमध्ये उमेदवार कोण, या प्रश्नावरून महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बैठकीत सोमवारी झालेल्या चर्चेत रावेर मतदारसंघाबाबत निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात चौधरी यांच्याशी वरिष्ठ नेत्यांनी संपर्क करून निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सूचनेनंतर चौधरी यांनीही पक्षाच्या नेत्यांना धन्यवाद दिले आहेत. त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करीत या उमेदवारीचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता रावेर मतदारसंघात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी उमेदवार असतील.
रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे यांचा विशेष प्रभाव आहे. लेवा पाटील समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात खासदार रक्षा खडसे या उमेदवार असल्याने भाजप सेफ पोझिशनमध्ये असल्याचे बोलले जाते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्रभैया पाटील, माजी आमदार चौधरी आणि विनोद सोनवणे हे तिघे इच्छुक होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन माजी आमदार चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.