Kakasaheb Tapkir Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Karjat-Jamkhed : शिंदे-पवारांमध्ये 'MIDC'वरून सुरू असलेल्या वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची 'Entry'

Pradeep Pendhare

Ahmednagar News : कर्जत-जामखेडमधील 'एमआयडीसी'वरून भाजप आमदार प्रा राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांच्यातील राजकीय युद्धात आता स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एन्ट्री करण्यास सुरूवात केली आहे.

आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातून होणारी एमआयडीसी सर्वसामान्यांसाठी खुली असून मागील लोकप्रतिनिधी यांच्याप्रमाणे कोणालाही विश्वासात न घेता ठरवणारी नाही, असा टोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी लगावला आहे.

कर्जत-जामखेडमध्ये आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांच्याकडून एमआयडीसी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती सभापती काकासाहेब तापकीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्या कारभारावर टीका केली. भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काकासाहेब तापकीर म्हणाले, "कर्जत-जामखेडमधील एमआयडीसी प्रत्यक्षात कुठे होईल, कोणत्या भागात केली जाईल याची सर्वस्व जबाबदारी प्रादेशिक औद्योगिक विकास महामंडळाच्या नियम, अटी आणि शर्ती नुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्णयानेच ठरेल. त्यामुळे जागेची पाहणी करताना फोटोसेशन म्हणणाऱ्यांची कीव येते.

मौजे पाटेगाव-खंडाळा भागात होणारी एमआयडीसी आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी लाभार्थी, परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना अंधारात ठेवत अचानक जाहीर केली होती. तसेच वास्तविक पाहता कर्जतच्या स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांना देखील विश्वासात घेण्यात आले नव्हते".

मात्र आता आमदार राम शिंदे यांनी आगामी नव्याने होणारी एमआयडीसी परिसरातील शेतकरी, लाभार्थी, ग्रामस्थ आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्व नियमानुसार जागेची पाहणी, भौगोलिक परिस्थितीनुसार सर्वांना विचारात घेतल्यावरच केली जाणार असल्याचेही तापकीर यांनी सांगितले.

हस्तक्षेपाशिवाय अहवाल तयार - तापकीर

एमआयडीसी जागेची प्रक्रिया ओपन-टू-ऑल राहणार असून त्यानुसार मागील आठवड्यात आणि बुधवारी औद्योगिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, सर्व्हेक्षक श्रीचंद राठोड यांनी पुन्हा कर्जत तालुक्यातील चार जागेची पाहणी करीत आपला अहवाल तयार केला आहे.

यामध्ये कोंभळी-थेरगाव, बहिरोबावाडी-पठारवाडी, कुंभेफळ-अळसुंदे आणि देऊळवाडी परिसरातील जागेची पाहणी झाल्याची माहिती काकासाहेब तापकीर यांनी दिली. औद्योगिक विभागाच्या निकष, नियम आणि अटी-शर्तीनुसारच कर्जत एमआयडीसीची जागा ठरणार असून कोणीही यात हस्तक्षेप करणार नाही. याची हमी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही काकासाहेब तापकीर यांनी सांगितले.

ही त्यांची उद्विग्नता - शेखर खरमरे

पाटेगाव-खंडाळा एमआयडीसी रद्द प्रस्तावानंतर 15 दिवसात कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या जागेचा दुसरा प्रस्ताव सादर करावा, या आदेशानुसार औद्योगिक विभाग कर्जत-जामखेडमध्ये काम करीत आहे. जनतेतून सहा जागेची निवड पुढे आली असून त्या जागेची प्राथमिक तपासणी विभागाचे वरिष्ठ अधिकारी करीत आहे.

यामध्ये कोणीच हस्तक्षेप करीत नाही. मात्र लोकप्रतिनिधींना ही प्राथमिक जागा पाहणी फोटोसेशन वाटत आहे. तर त्यांची उद्विग्नता यातून दिसत असल्याचा टोला तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT