Ram Shinde Yashwantrao Gadakh Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Yashwantrao Gadakh Meeting : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय भेट; सभापती शिंदेंचा गडाखांसोबत राजकीय 'विरंगुळा'

Ram Shinde meeting with Yashwantrao Gadakh fuels speculation over Ahilyanagar District Cooperative Bank election equations : जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणनीती चर्चेत असतानाच राम शिंदे यांनी घेतली गडाखांची भेट; दोन्ही बाजूंनी 'सदिच्छा भेट' असल्याचा दावा, मात्र राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण.

सरकारनामा ब्युरो

By विनायक दरंदले, नेवासा, अहिल्यानगर

Cooperative Bank Politics : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी गुरुवारी ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या 'विरंगुळा' बंगल्यावर जाऊन सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सुमारे तासभर बंद दाराआड झालेल्या या भेटीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरण आकार घेत आहे का, याबाबत विविध तर्कवितर्क रंगू लागले आहेत.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीसाठी सेवा संस्थांचे ठराव घेण्याची प्रक्रिया मागील महिन्यात पूर्ण झाली असून, आता संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली अधिक वेगाने सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रभावाला पर्याय म्हणून प्रा. राम शिंदे स्वतंत्र भूमिका घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांत बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांच्यासह विविध नेत्यांच्या भेटी घेतल्याचेही समोर आले आहे.

याच पार्श्वभूमीवर यशवंतराव गडाख यांच्याशी झालेली भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. विरंगुळा बंगल्यावर उद्योजक विजय गडाख यांनी प्रा. शिंदे (Ram Shinde) यांचे स्वागत केले. त्यानंतर चहापान आणि सत्काराचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला गडाख यांच्या प्रकृतीची विचारपूस झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील राजकीय अनुभव आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

मात्र, या भेटीबाबत दोन्ही बाजूंनी सावध भूमिका घेतली आहे. गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयाने ही केवळ सदिच्छा भेट असून सामाजिक आणि समकालीन विषयांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. तर प्रा. राम शिंदे यांनीही गडाख यांचे अनुभवसंपन्न मार्गदर्शन लाभले आणि सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाल्याचे सांगितले.

दोन्ही बाजूंनी ही भेट औपचारिक असल्याचे सांगितले जात असले, तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, प्रा. राम शिंदे सध्या जिल्हाभर विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याने या भेटीमागे भविष्यातील राजकीय जुळवाजुळव आणि जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणांची तयारी दडलेली असू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे 'विरंगुळा' बंगल्यावर झालेल्या या तासभराच्या बैठकीत नेमके काय घडले, याबाबतची उत्सुकता कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT