Shinde, Lanke and Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Assembly Winter Session : अहमदनगर जिल्हा नामांतर आणि विभाजनाच्या मुद्य्यावर अधिवेशनात शिंदे, लंके अन् जगतापांचे मौन!

Ahmednagar District News : चौंडीत मुख्यमंत्र्यांनी नामांतराची मात्रा केवळ घोषणाबाजी करत वापरली का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Mayur Ratnaparkhe

Ahmednagar District Name change and Division : राज्यात सर्वात क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात मोठा जिल्हा, विदर्भ वगळता इतर विभागांना स्पर्श करणारा राज्यातील मध्यवर्ती जिल्हा, देशाच्या उत्तर-दक्षिण अनेक राज्यांना जोडणारा अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. या भौगोलिक परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन अनेक दशकांपासून चर्चेत असले, तरी अद्याप ते प्रत्यक्षात झालेले नाही.

आमदार राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके यांची जाहीर मागणी जिल्हा विभाजनाची असली, तरी सध्या सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनात हे लोकप्रतिनिधी गप्प का? असा विषय चर्चेत येत आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून ते "अहिल्यानगर' अशी घोषणाच खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र त्याचेही पुढे काय असाही विषय आहे. विशेष म्हणजे नामांतर आणि विभाजन या विषयावर अनुकूल आणि आग्रही असलेले उत्तर नगर जिल्ह्यातील कारभारी आमदार राम शिंदे (Ram Shinde), आमदार संग्राम जगताप आणि आमदार निलेश लंके ही महायुतीत एकत्र असलेली आमदार तिकडी या विषयावर अधिवेशनात अद्याप मुद्दा उठवत नसल्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"अहिल्यानगर"चे काय झाले? -

याच वर्षी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजप विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी इथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास शासन निधी आणि मान्यता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) आदी मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव "अहिल्यानगर" असे घोषित केले होते.

खुद्द मुख्यमंत्री शिंदे(Eknath Shinde) यांनीच त्यांच्या अधिकारात ही घोषणा केली खरी, मात्र अद्याप त्यावर कुठलीही पुढील काय कार्यवाही झाली याची माहिती जनतेला नाही. विशेष करून धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती मधील समावेशवरून समाजात असंतोष असताना चौंडीत मुख्यमंत्र्यांनी नामांतराची मात्रा केवळ घोषणाबाजी करत वापरली का? असा प्रश्न पडला असून समाजाचे नेतृत्व करणारे राम शिंदे यांनीही यावर अधिवेशनात आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही.

खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनीच त्यांच्या अधिकारात ही घोषणा केली खरी, मात्र अद्याप त्यावर कुठलीही पुढील काय कार्यवाही झाली याची माहिती जनतेला नाही. विशेष करून धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती मधील समावेशवरून समाजात असंतोष असताना चौंडीत मुख्यमंत्र्यांनी नामांतराची मात्रा केवळ घोषणाबाजी करत वापरली का? असा प्रश्न पडला असून समाजाचे नेतृत्व करणारे आमदार राम शिंदे यांनीही यावर अधिवेशनात आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही.

राज्यात सर्वात मोठा जिल्हा -

भौगोलिक क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचा सात तालुक्यांचा मिळून उत्तर भाग मुळा-भंडारदरा-निळवंडे धरणांमुळे जलसिंचनात असल्याने सुजलाम सुफलाम मानला जातो. मोठा साखर पट्टा आणि सहकार संस्थांचे जाळे विणलेल्या उत्तर नगर पट्यात जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्यात वजनदार असलेले राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, कोपरगावचे काळे-कोल्हे, नेवाशाचे गडाख अशी दिग्गज मंडळी आहेत.

या तुलनेत दक्षिण नगर जिल्हा हा मराठवाड्याला लागून असून अवर्षण प्रवण तालुक्यांचा असल्याने जिरायती शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्याचे मुख्यालय नावाला अहमदनगर हे दक्षिण नगर जिल्ह्यात येत असले तरी जिल्ह्याची सर्व राजकीय सूत्र आणि गणिते हे उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांच्या हातात राहिली आहे.

जिल्हा परिषद, जिल्हा बँक पदाधिकारी निवडीत उत्तरेतील नेत्यांचा वचक दिसून येतो. त्यामुळे कुठेतरी दक्षिण नगर जिल्ह्यावर अन्याय होतो त्यातून दक्षिण नगर जिल्हा नागरी, शैक्षणीक, औद्योगिक आदी क्षेत्रात पिछाडल्याची भावना दक्षिण नगर जिल्ह्यात असून जिल्ह्याचे विभाजन हाच त्यावर मार्ग असल्याची मागणी कित्येक वर्षांची आहे.

दक्षिणेच्या अधोगतीला उत्तरेतील पुढारी जबाबदार? -

जिल्ह्याचे नामांतर अहमदनगर वरून अहिल्यानगरची घोषणा केल्याने खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर आपसूक जिल्हा विभाजनाची मागणी पुढे आली. त्यावरून नामांतर जिल्ह्याचे की अहिल्यादेवी यांच्या जामखेड तालुक्याचे? जिल्हा विभाजन भविष्यात झाल्यास उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते? त्याचे नाव काय?असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जिल्हा विभाजनाचा थोरात, विखे, रोहित पवार हे अनुकूल नसल्याचेच दिसून आले असले तरी दक्षिण नगर जिल्ह्यातील राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनाची ठोस मागणी अनेकदा केली आहे. यावरून त्यांनी उत्तरेतील विखे-थोरतांना धारेवर धरत दक्षिणेच्या अधोगतीला उत्तरेतील पुढाऱ्यांना निशाण्यावर घेतले होते. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही जिल्हा विभाजनाचा अनुकूलता दाखवली आहे.

मात्र सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना शिंदे, जगताप, लंके ही महायुतीत एकत्र असलेली मंडळी नामांतर आणि जिल्हा विभाजनावर एक प्रकारे चुप्पी साधून असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक पुढील वर्षी लोकसभा आणि त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. अशात जिल्हा नामांतर आणि विभाजन अशा विषयावर बोलणारे लोकप्रतिनिधी ऐन अधिवेशनात यावर का बोलत नाही याबद्दल नागरिकांतून विचारणा होत आहे.

नागरिकांची मतमतांतरे -

माहिती अधिकार कार्यकर्ते अ‍ॅड.श्याम असावा यांनी जिल्हा विभाजन गरजेचे सांगत दक्षिण नगर जिल्ह्याचा विकास त्याशिवाय होणार नाही. जिल्ह्यातील उत्तरेतील नेते यांच्यामुळेच दक्षिण भागावर अन्याय होत आल्याची भावना व्यक्त केली आहे. इतर वेळेस जिल्हा विभाजनाची मागणी करणारे नेते आता विखे-थोरातांच्या वर्चस्वामुळे गप्प आहेत का? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच उत्तर नगर जिल्ह्यात शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने उत्तरेतील नेत्यांचा डोळा दक्षिणेवर आहे. असे सांगत विखे, थोरतांना आपले वारसांच्या सोईसाठी विभाजन नकोय असा टोला लगावला आहे.

तर सामाजिक कार्यकर्ते जयंत येलूलकर यांनी जिल्ह्याची ओळख एक ऐतिहासिक आणि धार्मिक अशीच राहावी. शिर्डी, शनिशिंगणापूर हे धार्मिक क्षेत्र वेगळ्या जिल्ह्यात गेल्यास दक्षिण जिल्ह्यात उरेल काय? असा प्रश्न उपस्थित करत जिल्हा विभाजन नकोय अशी भूमिका सरकारनामाशी बोलताना व्यक्त केली.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT