Vikhe Patil, rani Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Patil News : विखेंनी एका वाक्यात संपवून टाकला लंकेंच्या लोकसभेचा विषय!

Rani lanke Loksabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोणता उमेदवार असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Pradeep Pendhare

Nagar political News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोणता उमेदवार असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (अजित पवार गट) यांच्या पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार, अशी घोषणा केली आहे. ही जागा भाजपकडे असून, राणी लंके यांच्या या घोषणेमुळे महायुतीत नगर दक्षिण लोकसभेत पेच निर्माण झाला आहे. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लंके दाम्पत्यावर खोचक टिप्पणी केली आहे. 'स्वयंघोषित उमेदवारांना कोण थांबवणार. महायुतीत आहोत, महायुती जो निर्णय घेईल, तो मान्य करायचा,' अशा एका वाक्यात मंत्री विखेंनी नगर दक्षिण लोकसभा उमेदवाराचा विषय संपवून टाकला.

नगर जिल्हा नियोजन मंडळाच्या पुढील वार्षिक आर्थिक आराखड्याच्या आढाव्यासाठी मंत्री विखे नगर जिल्हाधिकारी कार्यालयात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर थेट टीका केली. तसेच आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावरदेखील टिप्पणी केली. आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 'शिवस्वराज्य' यात्रा सुरू केली असून, पाथर्डीतून तिची सुरुवात केली आहे. ही यात्रा सुरू करताना त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच, अशी घोषणा केली आहे. यावर मंत्री विखे यांनी एका वाक्यात विषय संपवून टाकला. विखे म्हणाले, स्वयंघोषित उमेदवारांना कोण थांबवणार? मात्र, महायुतीचा धर्म पाळून पक्षश्रेष्ठींकडून घेतलेले निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील, असे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊत- सुप्रिया सुळेंवर विखेंची टीका

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेकांचे प्रपंच देशोधडीला लावले आहेत. त्यांची यादी मी लवकरच जाहीर करणार आहे. माधव गडकरी आज असले असते तर त्यांच्याबाबत काय झाले ते त्यांनी सांगितले असते, असे सांगून शासन आपल्या दारी कार्यक्रमातील खर्चाबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली असली तर आधी लवासाची श्वेतपत्रिका काढावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, शनैश्वर देवस्थानाची चौकशी सुरू असून, दोषींवर कारवाई होईल. तसेच महानंद दूध प्रकल्प गुजरातला हलवण्याची चर्चा बिनबुडाची आहे. तेथे ठाकरे सेनेचीच कामगार संघटना आहे. त्यामुळे यासंदर्भात होत असलेल्या आरोपांमध्ये अर्थ नाही, असेही त्यांनी सांगितले.

220 कोटींची वाढीव मागणी

नगर जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाचा 2024-25 चा प्रारुप आराखडा 630 कोटींचा असून, तो आणखी 220 कोटींनी वाढवून देण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी महापालिकेच्या माध्यमातून जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांद्वारे प्रयत्न केले जातील. तसेच सीना नदीतील गाळ काढून तिचे सुशोभीकरण करण्यासाठी 20 कोटींची मागणी केल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. नगर शहरामधील ओढ्या-नाल्यांतील अतिक्रमणांबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेण्याचेही मंत्री विखे यांनी सांगितले.

Edited By : Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT