नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी स्वत:मध्ये मोठा बदल घडवला आहे. महाविकास आघाडीत आमदार असताना आणि आताच्या भूमिकेत त्यांनी मोठा बदल केला आहे. याला सत्तेचे गणित म्हणायचे की मोठ्या संघर्षापूर्वी दोन पावले मागे येण्याचं धोरण, हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.
झाले असे की, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhangan Bhujbal) असताना आमदार सुहास कांदे यांनी कायम त्यांच्याविरोधात संघर्षाची भूमिका घेतली होती. आमदारी निधीवाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप सुहास कांदे वारंवार करीत होते. भुजबळ राष्ट्रवादीचे, तर कांदे शिवसेनेचे आणि सत्ता महाविकास आघाडीची असल्यामुळे त्यांच्यातील वाद 'मातोश्री'वर मिटवण्यात आला होता.
आमदार सुहास कांदे तेच आहेत, फक्त यापूर्वी ते शिवसेनेत होते आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. छगन भुजबळ तेच आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत आणि इथेच खरी मेख आहे. भुजबळ पालकमंत्री असताना सुहास कांदे यांनी निधीवाटपात अन्याय होत असल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात आरोप केले होते, तर आता दादा भुसे (Dada Bhuse) पालकमंत्री आहेत आणि ते शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे आता सुहास कांदे यांच्या भूमिकेत बदल झाला आहे.
यापूर्वी निधी मिळत नाही, असा आरोप करणारे आमदार सुहास कांदे आता निधी कमी मिळाला तरी चालेल, असे म्हणत आहेत. पण जिल्हा परिषदेच्या शाळांचे प्रश्न मार्गी लागायला हवेत, शाळांना स्वस्तात आणि कायम वीजपुरवठा व्हायला हवा, अशी भूमिका सुहास कांदे यांनी घेतली आहे. म्हणून मला कमी निधी द्या अन् तो निधी तिकडे वळवा, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद शाळांच्या आधुनिकीकरणावर चर्चा सुरू असताना सुहास कांदे यांनी नांदगावमधील अनेक शाळांना वीजपुरवठाच होत नसल्याची तक्रार केली. वीज नसेल तर शाळांचे आधुनिकीकरण कसे करणार, असा सवाल उपस्थित केला. त्यावर जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी हा पायलट प्रोजेक्ट असल्याचे, तसेच याबाबत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. मात्र, एकंदरीत जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेकडे कांदे यांच्यासह उपस्थित आमदारांनी लक्ष वेधले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून समाज घडतो. आयएएस, आयपीएस, वैज्ञानिक, अधिकारी अशा सर्वच स्तराच्या विद्यार्थ्यांना घडवले. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचायला हव्यात. त्यामुळे ज्या ठिकाणी शाळांचा प्रश्न असेल तिथे माझा निधी कमी करून तो शाळांसाठी वापरा, असे कांदे यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री दादा भुसे यांनीही हा मुद्दा चांगला असून, इतर आमदारांनी तसा प्रयत्न करायला हवा, असे स्पष्ट केले.
(Edited by Avinash Chandane)
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.