Jogendra Kawade Seat Demand: महायुतीत सत्ताधारी घटक पक्षांतील जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात आता महायुतीचे झाले थोडे आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी पाठविले घोडे, अशी स्थिती होण्याची चिन्हे आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत प्रा. कवाडे यांनी जागा वाटपात योग्य वाटा मिळालाच पाहिजे, असा इशारा दिला आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे बुधवारी जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाला थेट इशारा दिला. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जागा वाटपात योग्य स्थान हवे. अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केल्याचा इशारा त्यांनी दिला.
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी १५ जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली. भाजपच्या नेत्यांकडे आम्ही आमच्या मागण्या मांडणार आहोत. संदर्भात यापूर्वीही चर्चा झाली आहे. याबाबत तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आणि भावना तीव्र आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने महत्त्वाचा वाटा उचलला होता. आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मात्र महायुतीचे नेते आम्हाला योग्य वागणूक देत नाही. सन्मानजनक राजकीय सहभाग आणि वाटा मिळत नसल्याने आम्ही नाराज आहोत.
गेल्याच आठवड्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे (Jaideep Kawade) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूरक पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया पक्षात उमटल्या. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या राजकीय भूमिकेवर त्यांच्यात सहकाऱ्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे जळगावच्या जिल्हा अध्यक्षांसह ४० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे प्रा. कवाडे यांना चांगलाच हादरा बसला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रा. कवाडे यांनी तातडीने जळगावला धाव घेत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या दौऱ्यात कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे, जिल्हाध्यक्ष राजू मोरे यांसह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.
राजीनामे दिलेले नेते जगन सोनवणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांना यापूर्वीच पक्षातून काढण्यात आले आहे. त्यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याची तक्रार होती. त्यामुळे श्री सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजीनामा दिला, यात तथ्य नसल्याचे प्रा. कवाडे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.