Prakash Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का; जिल्हाध्यक्षासह युवा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसलाय. नगरमधून युवा पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे त्यांची साथ सोडली.

पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण आणि अरुण जाधव काम करून देत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश गायकवाड यांच्यासह युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिले.

नीलेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. युवा आघाडीचे काम करत असताना, वरिष्ठ पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण आणि अरुण जाधव यांच्याकडून अन्याय होत राहिला. कार्यकर्त्यांना बळ दिले जात नाही. परिणामी पक्षाची वाढ खुंटली आहे. वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना युवा पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी पक्षातील वरिष्ठांकडून चुकीची माहिती दिली गेली. गैरसमज पसरवले गेले. एकप्रकारे युवा पदाधिकाऱ्यांना पक्षात डावलले गेले. यातूनच युवा पदाधिकाऱ्यांचा भडका उडाला, असे नीलेश गायकवाड यांनी म्हटले.

नगर जिल्ह्यातील जामखेड इथं ओबीसी आरक्षण (OBC reservation) यात्रा प्रकाश आंबेडकर घेऊन आले होते. त्यावेळी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी स्टेजवर होते. परंतु युवा पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले. युवा कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काही उपक्रम हाती घेतला की, त्यांना टाळण्यात येत होते. हा प्रकार एकदा नाही, अनेकदा झाला. त्यातूनच पक्षातील युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि पक्षाला 'गुडबाय' करण्याचा निर्णय घेतल्याचे नीलेश गायकवाड यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीवेळीच आम्ही युवा पदाधिकारी राजीनामा देणार होतो, परंतु वेळ चुकीची होती, त्यामुळे थांबलो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने पक्षाला सोडणे योग्य वाटले नाही. परंतु आता युवा कार्यकर्त्यांनी सामूहीकपणे निर्णय घेत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. युवा प्रदेशाध्यक्ष नीलेश शिवकर्मा यांच्याकडे 10 ऑगस्टला नगर जिल्ह्यातील दोन नेत्यांना कंटाळून राजीनामा पाठवल्याचे नीलेश गायकवाड यांनी सांगितले.

नीलेश गायकवाड यांनी वंचितचा सोडचिठ्ठी दिल्यानंतर युवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित विचाराने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आंबेडकर पक्षात दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला. याचबरोबर नीलेश गायकवाड यांची नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT