Jal Jeevan Mission Yojana : अहमदनगर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जलजीवन मिशन योजना निकृष्ट कामामुळे पहिल्यापासून वादात अडकली आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा वाद झाले आहे. या योजनेवर प्रशासनाचे देखील लक्ष नसल्याचे दिसते.
आता तर काँग्रेस आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यात काढलेल्या जनसंवाद यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशन योजनेतील बोगसपणा कसा चालतो, याची पोलखोल केली आहे. या योजनेच्या तपासणीच्या कोऱ्या अहवालावर स्थानिक सरपंचाच्या सह्या घेतल्याचा प्रकार आमदार लहू कानडे यांनी ग्रामस्थांसमोर उघड करत खळबळ उडवून दिली.
काँग्रेस (Congress) आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूरमध्ये जनसंवाद यात्रा काढली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे आणि पुढे करायची महत्त्वाची कामे, या यात्रेच्या माध्यमातून ते श्रीरामपूरकरांना सांगत आहेत. या यात्रेनिमित्ताने आमदार कानडे मातुलठाण येथे होते. तिथे त्यांनी जलजीवन मिशनच्या कामात आढळलेला गंभीर प्रकार समोर आणला. कोणत्याही घरामध्ये अद्याप कनेक्शन दिलेले नसताना आणि जलजीवन योजनेचे पाणीही ग्रामस्थांना मिळत नसताना उर्वरित बिल काढून घेण्यासाठी थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची टीम चुकीचे काम करत आहे, असा आरोप आमदार कानडे यांनी केला.
अधिकारी, अभियंता आणि ठेकेदाराचे सुपरवायझर, अशा चौघा जणांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शनमध्ये ग्रामपंचायत सदस्य किंवा पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य किंवा कोणाही ग्रामस्थांना सहभागी करून न घेता तपासणीच्या कोऱ्या फॉर्मवर तेथील सरपंचाच्या सह्या घेत आहेत. तसे आढळून आले. हे करताना तेथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सदर दप्तर हस्तगत केले आणि संबंधितांना माझ्यासमोर उभे केल्याचा अनुभव आमदार कानडे यांनी सांगितला.
जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण नसताना या पद्धतीने खोटे-खोटे इन्स्पेक्शन करून उर्वरित रकमेची बिले काढून घेण्याचा हा प्रकार लक्षात आल्याने आमदार कानडे यांनी संबंधित टाटा कन्सल्टन्सीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.संपूर्ण गावकऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने सदरचा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविण्यात यावा, तसेच सदरचे दप्तर पुरावा म्हणून त्यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशा सूचना आमदार कानडे यांनी येथील सदस्य आणि ग्रामसेवकांना केल्या. आमदार कानडे यांना याबाबतचे उत्तर देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.