Jalgaon Politics News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. इच्छुकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार मात्र फारसे सक्रिय नाहीत.
जळगाव जिल्ह्यात विधानसभेतील सर्व दहा मतदारसंघांमध्ये महायुतीने बाजी मारली. त्यानंतर जामनेरचे गिरीश महाजन आणि जळगावचे गुलाबराव पाटील अपेक्षेप्रमाणे मंत्री झाले. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. तर, महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार कुठे हरवले? असा प्रश्न मतदार विचारत आहेत.
विधानसभा निवडणुकीत अनेक प्रश्नांची चर्चा झाली. विरोधी उमेदवारांनी त्याबाबत सरकार विरोधात राळ उठवली. मात्र निवडणूक संपताच हे प्रश्न सुटले की हरवले असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सर्वच आमदार सत्ताधारी असल्याने जनतेच्या प्रश्नावर आवाज कोण उठवणार? असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.
निवडणूक संपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि जामनेरचे दिलीप खोडपे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी वगळता अन्य उमेदवार फारसे सक्रिय नाहीत.
खडसे, खोडपे या दोन्ही पराभूत उमेदवारांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात प्रचार केलेल्या कार्यकर्त्यांसाठी काम सुरू केले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विजयी व्हावेत म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
ज्यांनी विधानसभेत सत्ताधारी पक्षाविरोधात मैदानात उतरून महाविकास आघाडीचा प्रचार केला. आमच्या विजयासाठी मेहनत घेतली. त्या सर्व इच्छुकांना जिल्हा परिषदेने पंचायत समितीत विजयी करण्यासाठी प्रचार करण्याची व झोकून देऊन काम करण्याची वेळ आता आमची आहे. ती जबाबदारी आम्ही पार पाडू असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिलीप खोडपे यांनी सांगितले. रोहिणी खडसे यादेखील आपल्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांसाठी सक्रिय आहेत.
जळगाव जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीने सत्तेचा पुरेपूर उपयोग करीत ताकद झोकून दिली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा एक उमेदवार हमखास होता. या उमेदवारांसाठी कार्यकर्ते झोकून देऊन काम केले. मतदारांनीही त्यांना मतदान केले. मात्र निवडणूक निकालानंतर अनेक प्रश्न तीव्र झाले आहेत. त्याबाबत विरोधी पक्ष मात्र फारसा आवाज उठवताना दिसत नाही. किंबहुना माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील यांसह चार माजी आमदार सत्ताधारी पक्षात दाखल होत सत्तेच्या आश्रयाला जाऊन बसल्याची चर्चा आहे.
जळगाव जिल्ह्यात जयश्री महाजन (जळगाव शहर), गुलाबराव देवकर (जळगाव ग्रामीण), संतोष पाटील (पारोळा), उमेश पाटील (चाळीसगाव), अनिल शिंदे (अमळनेर), अमोल शिंदे, वैशाली सूर्यवंशी, डॉ मानवतकर, डॉ. बारेला चंद्रकांत, प्रभाकर सोनवणे आदी बहुतांशी उमेदवार निवडणूक निकालानंतर सक्रीय असल्याचे दिसून येत नाहीत. त्यामुळे ते अजुनही विश्रांतीच घेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महाराष्ट्र जागृत जनमंच संस्थेचे शिवराम पाटील म्हणाले, पराभूत उमेदवारांना जनतेने मतदान केले आहे. मतदान करून जनतेने पाप तर केले नाही ना? असा प्रश्न त्यांनी केला. हे सर्व उमेदवार अज्ञातवासात केले थोडक्यात ते फक्त निवडणूक काळात महिनाभर सक्रिय असतात. यांच्याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी विचार करावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.