Rohini Khadse meeting at Mantralaya
Rohini Khadse meeting at Mantralaya Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

रोहिणी खडसेंचा पाठपुरावा; जोंधनखेडा धरणासाठी ३० कोटी मंजूर

Sampat Devgire

मुक्ताईनगर : जोंधनखेडा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवर कुंड धरणाच्या अपूर्ण कामासाठी जलसंपदा विभागाकडून ३० कोटी ८४ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.

एकनाथ खडसे हे मागील युती शासनाच्या काळात पाटबंधारे मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून जोंधनखेडा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवर कुंड धरणाची निर्मिती करण्यात आली होती. या धरणामुळे कुऱ्हा, पारंबी, हिवरा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या धरणाच्या भिंतीची उंची वाढवावी व सांडव्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करावे, अशी परिसरातील शेतकरी बांधवांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन आणि जिल्ह्यातील इतर प्रलंबित प्रकल्प मार्गी लागावे, यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या मागणीनंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षतेखाली २० ऑगस्ट २०२१ ला मंत्रालयात बैठक झाली होती.

जिल्ह्यातील सिंचन योजनांची व प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत रोहिणी खडसे यांनी इतर सिंचन योजनांबरोबर कुंड धरणाची उंची वाढविणे व सांडव्याचे काम पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व निधी मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार जोंधनखेडा लघुपाटबंधारे योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या प्रकल्पास जलसंपदा विभाग दरसूची २०१६- १७ वर आधारित ३०.८४ कोटी इतक्या किंमतीस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे धरणाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातून धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवाना लाभ होणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT