Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीवरून भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढाई रंगली आहे. या मुद्यावरून आता एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका सुरू झाली आहे. आमदार पवार(Rohit Pawar) यांनी महायुती सरकारवर टीका करत आमदार शिंदे यांचे नाव न घेता बिनडोकं म्हटले आहे. यावरून वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रस्ताव तयार करून त्याला महायुती सरकारकडून मंजुरी मिळवली होती. परंतु भाजपचे आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर मंत्रालय पातळीवर मंजूर प्रस्ताव रद्द झाला. यावर आमदार पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला. परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी या मुद्यावर आमदार शिंदेंची बाजू उचलून धरली. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या टीकेची धार अधिकच वाढवली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार रोहित पवार म्हणाले, "जेव्हा सरकार बिनडोक माणसांचे ऐकते तेव्हा सामान्य लोकांचे खूप नुकसान होते. माझ्या मतदारसंघात देखील हेच होत आहे. एका बिनडोक व्यक्तीचे ऐकता, ऐकता सरकार एवढ्या पातळीवर गेलं आहे की, सरकार विकासच विसरून गेलं आहे. माझ्या एका मतदारसंघातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे".
दरम्यान, आमदार राम शिंदे यांनी एमआयडीसीसाठी नव्याने प्रस्तावाची तयारी सुरू केली आहे. कोंभळी, चिंचोली रमजान परिसर, थेरगाव राष्ट्रीय महामार्गा लगत, वालवड सुपे परिसर, अळसुंदा, कोर्टी परिसर, शेती महामंडळाशेजारी, पठारवाडी, देऊळवाडी, दगडी बारडगाव ही सहा ठिकाण पहिल्याच बैठकीत सुचवण्यात आली आहेत.
एमआयडीसीसाठी जागा निश्चित करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच जमीनधारकांना सरकार रेडिरेकनर दराच्या चार पट मोबदला देते आणि संबंधित शेतजमीन मालकाला त्याच्या जमिनीच्या दहा टक्के भूखंड निःशुल्क दराने व्यवसायासाठी दिला जातो, अशी माहिती देत जमिनी दलालांना विकू नका, असे आवाहन देखील आमदार राम शिंदे यांनी केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.