RPI workers agitation at Manmad
RPI workers agitation at Manmad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज ठाकरेंवर देशद्रोहाचा खटला दाखल करा!

Sampat Devgire

मनमाड : एकीकडे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakrey) यांनी मस्जिदीवरील भोंगे (loudspeakers on Mosque) काढा, नाहीतर त्याच्या दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे शहर रिपाइंतर्फे (RPI) भोंग्यांना संरक्षण देऊन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.

पालिका कार्यालयाजवळून रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर धिवर, जिल्हा संघटक अनिल निरभवणे, तालुकाध्यक्ष कैलास आहिरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात निळे ध्वज घेऊन गळ्यात निळ्या मफलर घालत राज ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगीना मस्जिदीजवळ मोर्चा आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सध्या दंगली घडविण्याचे राजकारण सुरू असून, हे कोणत्याही देशासाठी विकासाला अडथळा आणणारे आहे. जाती- धर्मात दंगली होऊ नये, त्या दंगली रोखणे ही आपली सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे, धर्म आणि जातीच्या नावाने दंगली पेटविणाऱ्यांचे षडयंत्र काही जातीयवादी शक्ती करीत आहेत.

धार्मिक स्थळांचे भोंगे काढून टाका, असा कायदा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाही. धार्मिक स्थळे असो की कार्यक्रम सभारंभ असो, पोलिसांची रितसर परवानगी घेऊन सायंकाळी दहा ते सकाळी सहापर्यंत भोंगे वापरण्यास बंदी, शांतता झोन व सामान्य परिसरामध्ये विशिष्ट ‘डेसिबल’चा नियम पाळून भोंगा अथवा लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी आहे. मात्र, जाती- धर्माचे राजकारण करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही हिंदुत्ववादी संघटना व दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करीत आहे. जाहीर सभांद्वारे मुस्लिमांच्या भावन भडकविल्या जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार भोंग्यांचे संरक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचे सर्वत्र पालन करावे लागते. मात्र, केवळ एकाच समाजघटकाला लक्ष्य केले जाते. त्यामुळे मस्जिदीसह सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्याचे रक्षण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करेल, धार्मिक तेढ निर्माण करणाच्या राज ठाकरेंवर गुन्हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मंडल अधिकारी श्री. नरोटे आणि प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या वेळी दिनकर कांबळे, शेखर आहिरे, गुरू निकाळे, विलास आहिरे, सुरेश शिंदे, प्रशांत दराडे, नाना आहिरे, सुरेश जगताप, पद्माकर निळे, बाबा शेख, अरुणा जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT