Ramdas Athawale Shirdi : केंद्रातील सत्ताधारी एनडीएमधील रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ही भावना व्यक्त केली. “शिर्डी हा माझ्यासाठी केवळ मतदारसंघ नाही, तर जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आहे. योग्य वेळ आल्यावर महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिर्डीच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
शिर्डी (Shirdi) दौऱ्यात आठवले यांनी विविध सरकारी बैठका घेतल्या तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर समाजमाध्यमांवर पोस्ट करत त्यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा पुन्हा अधोरेखित केली. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
रामदास (Ramdas Athawale) यांनी काँग्रेस आघाडीच्या काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडत एनडीएला पाठिंबा दिला. भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली आणि पुढे केंद्रीय मंत्रिपदही बहाल केले. तरीदेखील शिर्डीतून लोकसभेत जाण्याची त्यांची इच्छा अद्याप अपुरीच राहिली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून सदाशिव लोखंडे मैदानात होते. मात्र त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे यापूर्वी काँग्रेसच्या पाठबळावर लढणारे आठवले आणि महायुतीचे उमेदवार लोखंडे या दोघांनाही भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभूत केले होते. नंतर वाकचौरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
शिर्डी दौऱ्यात बोलताना आठवले म्हणाले, “शिर्डीतील जनतेने मला कायमच आपलं मानलं. मतदानाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक सुख-दुःखात इथली माणसं मला जोडून घेतात. या प्रेमाचं ऋण फेडायचं आहे. शिर्डीच्या भूमीत आल्यावर मला नेहमी नवी ऊर्जा मिळते आणि जुन्या आठवणी जाग्या होतात.”
रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे महायुतीत शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत आगामी काळात नवी राजकीय समीकरणं तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.