Maharashtra Epstein Files : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं. खरातने आपल्याकडील कथित शक्तीचा दावा करत शेकडो महिलांचे लैगिंक शोषण केलं. तसेच अनेकांची आर्थिक फसवणूक करत मोठी माया जमवली.
या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातची पाद्यपूजा करतानाचा फोटो व व्हिडिओ समोर आला होता. रूपाली चाकणकर यांचे अशोक खरातशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप काही लोकांकडून झाला. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. त्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
महाराष्ट्र हादरवणाऱ्या अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आधारीत सिनेमा येणार असून या सिनेमात रुपाली चाकरणकरांच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली सय्यद दिसणार आहे. 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' असे या चित्रपटाचे नाव आहे. या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाच्या विषयामुळे या सिनेमाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान या चित्रपटासंदर्भात रुपाली चाकणकरांनी पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. लवकरच कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. जो कथित सिनेमा येतो आहे ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालय प्रविष्ट प्रकरणात कोणत्याही पद्दतीची चित्रपट निर्मिती तुम्हाला करता येत नाही.
दुसरी गोष्ट, एखादे पात्र साकारताना सबंधित पात्राची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु माझी कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे. कारवाईचे स्वरुप स्पष्ट करताना दोन दिवसांत संबधितांना नोटीसा पोहचतील असं चाकणकर म्हणाल्या.
बदनामी करणाऱ्यांना नोटीसा
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील लोक ज्या भावनेतून खरातकडे जात होते तसे माझेही कुटुंब जात होते. पंरतु केवळ मलाच टार्गेट करण्यात आलं. माझ्या कुटुंबियांवर सुद्धा खालच्या पातळीचे आरोप करण्यात आले. माझा पुतण्या, मुलगा हे राजकारणातही नाही ते आजून शैक्षणिक आयुष्य चालू आहे मात्र तरीही त्यांच्यावर टीका करण्यात आली.
४ एप्रिल रोजी मी आशा मिरगे यांच्या विरोधात नोटीस पाठवली होती. त्यांनी या नोटीसा स्विकारल्या नाही. तीन वेळा नोटीस पाठवली तरी त्यांनी नोटीस घेतली नाही. म्हणून मला माझ गाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. न्यायालयाने मिरगे यांना समन्स काढून कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आशा मिरगे कोर्टात आज हजर होत्या. पुढची तारीख २३ दिली आहे.
मिरगे यांच्याप्रमाणेच कोणताही पुरावा नसताना इतरही महिला होत्या ज्यांनी आरोप केला. त्यात मी दिल्ली हायकोर्टात दावा दाखल केला आहे. त्यात आशा मिरगे यांच्यासह रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांना नोटीसा पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.