Sajan Pachpute, Uddhav Thackeray News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: ठाकरेंच्या गळाला नगरमधील तिसरा नेता ; वाकचौरे, छल्लारे यांच्यानंतर साजन पाचपुतेही शिवबंधन बांधणार

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray Group News: श्रीगोंदे (नगर) काष्टीचे सरपंच व भाजपचे (BJP) दिवंगत नेते सदाशिव पाचपुते यांचे पुत्र साजन पाचपुते हे लवकरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रदेश करणार आहेत. त्यांनीच या माहितील दुजोरा दिला आहे. शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर श्रीरामपूरचे माजी नगरसेवक संजय छल्लारे, सुधीर वायखिडे यांनी आज त्यांच्या समर्थकांसह 'मातोश्री' येथे ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता साजन पाचपुतेही लवकरच प्रवेश करणार असल्याने नगरमध्ये ठाकरेंची ताकद वाढणार आहे.

नगरचे राजकारण नियमित चार-पाच कुटुंबांभोवती फिरले आहे. असे असताना शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या रुपाने नगरमध्ये शिवसेनेची ताकद होती. मात्र, त्यांच्यानंतर शिवसेनेची नगरमधील ताकद काहीशी कमी झाली. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील १३ खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामध्ये शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडेही त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे ठाकरेंना नगरमध्ये मोठा धक्का बसला होता. वाकचौरे आणि छल्लारे यांनी आज प्रवेश केला आहे. त्यानंतर आता पाचपुते यांचाही प्रवेश होणार असल्यामुळे आगामी काळात ठाकरे शिवसेनेला नगरच्या राजकारणात चांगले दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे साजन हे पुतणे आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि त्यात साजन यांनी सफाईदार विजय मिळविला. त्यावेळी कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

मध्यंतरी साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकलीही होती. काष्टी हे तालुक्यातील मोठे गाव तेथील सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते. त्यांचे व ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

दोन दिवसांपुर्वी मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साजन पाचपुते यांनी भेट घेतली. त्यावेळी साजन हे ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खुद्द पाचपुते यांनीच दिली. साजन पाचपुते यांचा लवकरच प्रवेश होणार असून त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी मिळणार असल्याचेही समजते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT