Sakalai lift irrigation scheme : गेल्या चार दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याचबरोबर भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी 'लोकसभा 2029' ची तयारी सुरू केल्याचे संकेत दिले.
भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या योजनेसाठी मंत्रालय पातळीवर मोठा पाठपुरावा करत होते. सुजय विखे पाटील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठपुरावा करत होते.
साकळाई योजनेची गेल्या चार दशकांपासून मागणी आहे. साकळाई कृती समितीने या योजनेसाठी पाठपुरावा करत होती. विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्याकडे जलसंपदा विभागाचा कारभार आला. कृती समितीनं, मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. पुढे मंत्री विखे पाटलांनी पाठपुराव्याला मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब करून घेतलं.
या पाठपुराव्याला आता यश आले असले तरी, विखे पाटील पिता-पुत्रांची आगामी निवडणुकीची (Election) तयारी सुरू असल्याचे संकेत दिलेत आहे. या योजनेच्या मंजुरीतून विखे पाटील पिता-पुत्रांनी एका दगडात दोन निशाणा साधले आहेत. दिवाळीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे.
ही योजना श्रीगोंदा आणि नगर तालुक्यासाठी वरदान ठरणारी आहे. तिथं विखे पाटील पिता-पुत्रांना बळ मिळणार आहे. लोकसभा 2024च्या निवडणुकीत श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील सुजय विखे पाटील यांच्या लिडवर काहीसा परिणाम झाला होता. तो यानिमित्ताने भरून येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सुजय विखे पाटील देखील या योजनेसाठी प्रचंड आक्रमक होते. लोकसभा 2019च्या निवडणुकीला समोरे जाताना विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित वाकळी (ता. नगर) इथं सभा घेताना, साकळाई योजनेची घोषणा केली होती. विखे पाटील निवडून आले. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार आले आणि ही योजना मागे राहिली.
सुजय विखे पाटील यांचा 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. पण केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. हेच लक्षात घेऊन सुजय विखे पाटील यांनी त्यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून, राज्य सरकारकडे साकळाई योजनेचा पाठपुरावा सुरूच ठेवला.
साकळाई योजनेसाठी सर्व्हे झाले. फेर सर्व्हे झाले. मंत्री विखे पाटील यांनी राज्य सरकारला योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करत, पाठपुरावा सुरू ठेवला. साकळाई योजनेला आता राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेला मंजुरी घेत, मंत्री विखे पाटील यांनी त्याचे पुत्र माजी खासदार विखे पाटील यांच्या लोकसभा 2029ची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात वर्षांपूर्वी साकळाई योजनेसाठी शब्द दिला होता. ही योजना 1 हजार 234 कोटी रुपये खर्च करून येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हैसगाव येथून 4 टप्प्यांत पाणी उचलून ते श्रीगोंदा व नगर तालुक्यातील 32 गावांना दिले जाणार आहे. त्यातून लघू पाझर तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे, गाव तळे भरुन घेतली जाणार आहेत. या योजनेसाठी 1.60 टिएमसी पाणी सिंचनासाठी व 0.20 टीएमसी पाणी पिण्यासाठी देण्याचे नियोजन आहे.
चार पंपगृह व तीन वितरींकाद्वारे एकूण चार टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. हे पाणी तब्बल 208 मीटर उपसा करून चिखली व घुटेवाडी इथल्या डोंगरावरील वितरण हौदात सोडण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण 39.71 हेक्टर क्षेत्र आवश्यक असून त्यापैकी 30.22 हेक्टर खासगी क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.