Sameer Bhujbal & Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sameer Bhujbal Politics: समीर भुजबळांची एन्ट्री आमदार सुहास कांदे यांच्या पथ्यावर की अडचणीची?

Sampat Devgire

Kande Vs Bhujbal News: नांदगाव विधानसभा मतदारसंघात गेले वर्षभर गद्दार विरुद्ध निष्ठावंत असे राजकारण रंगवले जात होते. यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांमध्ये चुरस होती. आता त्याला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

नांदगावच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नवा डाव टाकला आहे. गेले दोन महिने त्यांचे समर्थक सक्रिय आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यंदा माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या ऐवजी माजी खासदार भुजबळ हे शिंदे गटाचे आमदार कांदे यांना आव्हान देतील.

या निमित्ताने भुजबळ विरुद्ध कांदे ही पारंपारिक लढत होईल हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र भुजबळ यांच्या एंट्रीने महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. या निमित्ताने महायुतीमध्ये बंडखोरी होणार हे स्पष्ट आहे.

महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडल्यासारखाच आहे. पक्षाचे गणेश धात्रक हे संभाव्य उमेदवार आहेत. अशा स्थितीत तिरंगी लढत झाल्यास आमदार कांदे यांच्या विरोधकांच्या मतांमध्ये फूट पडणार हे स्पष्ट आहे.

या स्थितीत आमदार सुहास कांदे यांच्या दृष्टीने ते फायद्याचे ठरू शकेल. त्यामुळे सध्या माजी भुजबळ यांच्या उमेदवारीची विशेष चर्चा होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून नांदगाव मतदार संघात भुजबळ विरूद्ध कांदे अशी लढत राहिली आहे. त्यात नांदगाव बाहेरचा उमेदवार आमदार आहे.

यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होणार की, स्थानिक नेत्यांना संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. या मतदारसंघाची विभागणी अतिशय क्लिष्ट आहे. येथे सात पैकी तीन जिल्हा परिषद गट मालेगाव तालुक्यातील आहेत. त्या जिल्हा परिषद गटांमध्ये मधुकर हिरे आणि प्रशांत हिरे यांच्या नात्यागोत्याचा प्रभाव आहे.

मालेगावच्या तीन गटांतून मिळणारी आघाडी नांदगावच्या उमेदवाराला विजयाकडे नेते. नांदगाव तालुक्यात चार जिल्हा परिषद गट आणि नादंगाव व मनमाड दोन नगरपालिका आहेत. यामध्ये मनमाड नगरपालिका मतदारसंख्येमुळे निर्णायक असते. अशा स्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे श्री. धात्रक हे मनमाड शहराशी संबंधित आहेत.

आमदार कांदे यांचा संपर्क संबंध मतदारसंघात व तालुक्यात आहे. शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून धात्रक यांना मालेगावच्या तिन्ही जिल्हा परिषद गटांतून आघाडी देणार, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक भुजबळ विरुद्ध कांदे अशी परंपरागत लढत होऊ शकते.

माजी खासदार भुजबळ यांनी उमेदवारी केल्यास महायुतीत बंडखोरी होईल. अशा स्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्री. धात्रक मतदारसंघात किती प्रभाव टाकतील व तो किती परिणामकारक विषय ठरेल, हा चर्चेचा विषय आहे. कारण कांदे यांच्या विरोधात मंत्री भुजबळ यांसह सर्व विरोधक एकत्र लढत आले आहेत. त्यांच्यात फूट अटळ होईल.

सध्या माजी खासदार भुजबळ यांनी मतदारसंघात जोरदार संपर्क मोहीम सुरू केली आहे. महाविकास आघाडीचे इच्छुक धात्रक यांनीही आपल्या समर्थकांना सक्रिय केले आहे. यामध्ये भुजबळ यांची उमेदवारी विद्यमान आमदार कांदे यांना सोयीची की गैरसोयीची याची गणिते मांडण्यात समर्थक व्यस्त झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT