Balasaheb Thorat News: आज नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे व्हावी यासाठी आंदोलन झाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या या आंदोलनात आरोपांची जोरदार बरसात झाली. यामध्ये रेल्वेचे विरोधक आणि समर्थक दोघेही शिर्डीच्या साईबाबाला शरण गेल्याचे चित्र दिसले.
नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर नारायणगाव चाकण मार्गे करावा या मागणीसाठी आज दोन तास पुणे महामार्ग रोखून धरण्यात आला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हिवरगाव टोल प्लाजा येथे आंदोलन झाले. आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वक्त्याने पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यामुळे हे आंदोलन थोरात विरुद्ध विखे राजकारणाचा आखाडा बनल्याचे चित्र होते.
यावेळी बहुतांश वक्त्यांनी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्या टिकेचे लक्ष्य केले. डॉ. विखे पाटील यांनी शिर्डीला रेल्वे येऊ नये यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर साईबाबा कोपतील असे म्हटलो होतो. त्याचा संदर्भ घेत छात्र भारती संघटनेचे अनिकेल घुले, विश्वास मुर्तडक, शिवाजी जगताप, सीताराम राऊत यांनी विखे आमच्या रेल्वेच्या मार्गात आडवे आले. त्यांना त्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले.
शिर्डीला रेल्वे आहे. तरीही आमची रेल्वे पळवण्याचा घाट पालकमंत्र्यांनी घातला आहे. श्री. साईबाबा देखील येत्या निवडणुकीत त्याना त्याचे फळ दिल्याशिवाय राहणार नाही, असे श्री. मुर्तडक म्हणाले, तर आंदोलनाचा समारोप करताना श्री. थोरात यांनी साईबाबा आमच्याच बरोबर राहील, कारण आम्ही चांगल्या कामासाठा संघर्ष करीत आहोत. विरोध करणारे अन् दिशाभूल करणाऱ्यांवरच साईबाबांचा कोप होईल, असे म्हणाले.
श्री. थोरात यांच्या रडारवर पालकमंत्री विखे-पाटील अन् आमदार अणोल खताळ दोघेही होते.पालकमंत्र्यांचा नामोल्लेख टाळत, साईबाबांचा चांगल्या कामाला आशीर्वाद असतो. चांगल्या कामात कुणी राजकारण करू नये, अशी टीका केली. आमदार खताळ यांना उद्देशून काही मंडळी नेहरू गार्डनच्या रेल्वे पलीकडे जात नाही, अशी टीका त्यांनी आमदार खताळ यांच्यावर केली.
नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याकरता संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिकांनी एकत्र येत तीन तास ठिय्या आंदोलन केले. नागरिक महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे घोषणांच्या निनादात तीन तास चक्काजाम आंदोलन झाले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या हायस्पीड रेल्वे मार्गाकरता केंद्र व राज्य सरकारच्या सर्व मंजुरी मिळालेल्या असताना हे चांगले काम थांबले कसे, असा सवाल काँग्रेस नेते थोरात यांनी केला.
पद्मश्री रघुवीर खेडकर म्हणाले की, मी कलावंत म्हणून नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करत आहे. हे संगमनेरच्या प्रवरेचे पाणी आहे. संगमनेरचे रक्त आहे. ते थांबत नाही. आमची प्रगती कोणी थांबू शकत नाही. सरळ रेल्वे मार्गासाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले आहेत. साईबाबा आमच्या हृदयात आहेत भावनिक शब्द वापरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. हक्काची रेल्वे मिळाली पाहिजे.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, जयश्री थोरात, प्रा हिरालाल पगडाल, रामहरी कातोरे, अनिकेत घुले, डॉ कोल्हे, अमर कतारी, विश्वासराव मुर्तडक, सिताराम राऊत, उत्कर्षाताई रूपवते, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली. या आंदोलनासाठी नागरिक नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या गांधी टोप्या घालून सहभागी झाले.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.