Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangamner Politics : थोरात म्हणाले, ‘हे पोरकट राजकारण’; संगमनेरमध्ये श्रेयवादावरून संघर्ष

Political tensions escalate in Sangamner over credit for development works as Satyajeet Tambe hits back at opponent : विकासकामे, निधी आणि थेट पाइपलाइनवरून राजकीय दावे-प्रतिदावे; सत्यजित तांबेंचा विरोधकांना सवाल

Pradeep Pendhare

Balasaheb Thorat on Sangamner politics : संगमनेरमधील विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरातील सध्याच्या राजकीय वातावरणावर चिंता व्यक्त केली.

निवडणुकीनंतर संगमनेरमध्ये राजकारण न करण्याची अलिखित परंपरा होती; मात्र सध्या सुरू असलेले राजकारण हे पोरकटपणाचे आणि दुर्दैवी आहे, अशी टीका थोरात यांनी केली.

संगमनेर नगरपरिषदेने मागील आठ महिन्यांत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध विकासकामांवर भर दिला असल्याचे थोरात यांनी सांगितले. आगामी काळातही शहराच्या विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. थोरात (Balasaheb Thorat) यांनी संगमनेरच्या विकासाच्या वाटचालीचा संदर्भ देताना डॉ. सुधीर तांबे 1992 मध्ये नगराध्यक्ष झाल्यापासून शहराच्या विकासाला नवे पर्व सुरू झाल्याचे सांगितले. त्यानंतर नगरपरिषदेने सातत्याने चांगली वाटचाल केल्याचा दावा त्यांनी केला.

निळवंडे धरणाचे दोन्ही कालवे तसेच धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणी उपलब्ध झाल्यामुळे संगमनेर (Sangamner) शहरात पाण्याची मुबलकता निर्माण झाल्याचे थोरात यांनी नमूद केले. ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेती आणि भाजीपाला व्यवसायालाही चालना मिळत असून त्याचा सकारात्मक परिणाम शहरातील बाजारपेठेवर होईल, असे त्यांनी सांगितले.

शहरात यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा संदर्भ देत थोरात यांनी नगरपरिषदेच्या नव्या टीमने मागील आठ महिन्यांत ही विकासाची वाटचाल पुढे नेल्याचे म्हटले. मात्र, आगामी काळात सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सहभागातून संगमनेर शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेने प्रयत्न करावेत, असे आवाहनही थोरात यांनी केले.

संगमनेरच्या राजकीय संस्कृतीचा उल्लेख करताना थोरात म्हणाले की, निवडणूक संपल्यानंतर शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची परंपरा होती. मात्र सध्या विकासकामांवरून सुरू असलेला श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेप हा पोरकटपणाचा प्रकार असून तो दुर्दैवी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, आमदार सत्यजित तांबे यांनीही शहरातील विकासकामांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला. बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या थेट पाइपलाइन योजनेमुळे संगमनेरला मुबलक पाणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात अद्ययावत तंत्रज्ञानाचे 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे सांगत या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा नियोजन समिती आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे तांबे यांनी आभार मानले.

न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नका

विकासकामांच्या श्रेयावरून विरोधकांना लक्ष्य करताना तांबे यांनी, 'दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ नका', अशी भूमिका मांडली. संबंधित कामांसाठी विरोधकांनी कोणतीही शिफारस केलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. नगरपरिषदेसाठी मंजूर झालेला निधी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविल्याचा आरोपही तांबे यांनी केला. शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आपण तत्काळ ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. न आणलेल्या निधीचे आणि न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नका. निधी कसा आणायचा, हे आम्हाला चांगले माहीत आहे, असा टोला तांबे यांनी विरोधकांना लगावला. त्यामुळे संगमनेरमध्ये विकासकामांचे श्रेय, निधी आणि राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून थोरात आणि तांबे यांच्या वक्तव्यांमुळे स्थानिक राजकारणातील संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT