Sujay Vikhe Miracle Remark : ‘रेल्वे शिर्डीकडे वळली तो साईबाबांचा चमत्कार’; विखेंच्या विधानावर अंनिसचा आक्षेप

Shirdi railway row intensifies over Sujay Vikhe Patil ‘Sai Baba miracle’ remark : ‘विकासकामे म्हणजे चमत्कार नव्हेत, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा’, हमीद दाभोलकरांचा सवाल; रेल्वे प्रकल्पाचे श्रेय नियोजन, प्रशासन आणि अभियांत्रिकीला देण्याची अंनिसची भूमिका
Sujay Vikhe Miracle Remark
Sujay Vikhe miracle remarkSarkarnama
Published on
Updated on

Shirdi Nashik Railway : शिर्डी-नाशिक रेल्वे मार्गावरून राजकीय वादाला नवा रंग आला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीपर्यंत रेल्वे मार्ग वळण्यामागे साईबाबांचा ‘चमत्कार’ असल्याचे विधान केले.

त्यांच्या या विधानावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप घेतला असून, विकासकामांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी एका कार्यक्रमात साईबाबांचे स्मरण करताना शिर्डीमार्गे रेल्वे नेण्यासाठी आपण कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे सांगितले. मात्र, साईबाबांचा ‘चमत्कार’ झाला आणि रेल्वे शिर्डीच्या दिशेने वळली, असा दावा त्यांनी केला. साईबाबांचा आशीर्वाद असल्यामुळे शिर्डीला रेल्वे वळाली आणि हा चमत्कार आपण नाकारू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

विखे पाटील यांच्या या विधानावर अंनिसने आक्षेप घेतला आहे. अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट शेअर केली. ‘विकासकामे म्हणजे चमत्कार नव्हेत, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगूया’, असा संदेश देत त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले.

Sujay Vikhe Miracle Remark
Pune Nashik Railway : ‘हा साईबाबांचा चमत्कार’; पुणे-नाशिक रेल्वेवर सुजय विखे पाटलांचं मोठं विधान

रेल्वे मार्गाचे नियोजन, तांत्रिक सर्वेक्षण, प्रशासकीय प्रक्रिया, शासकीय निर्णय तसेच विज्ञान आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या आधारे रेल्वे प्रकल्प साकारले जातात. त्यामुळे कोणताही रेल्वे मार्ग ‘चमत्काराने’ वळत नाही, अशी भूमिका अंनिसने मांडली आहे. राजकीय नेत्यांनी विकासकामांना ‘चमत्कार’ असे संबोधणे हे जादूटोणाविरोधी कायद्याच्या मूळ भावनेशी विसंगत असल्याचा दावा अंनिसकडून करण्यात आला आहे. तसेच संविधानाने नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यावर दिलेल्या भराचाही संदर्भ अंनिसने दिला आहे.

Sujay Vikhe Miracle Remark
Sujay Vikhe Highway : ‘हा रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो’; अहिल्यानगर-मनमाड महामार्गासाठी डिसेंबरची डेडलाइन

अंधश्रद्धेला खतपाणी

डॉ. हमीद दाभोलकर यांनी शेअर केलेल्या क्रिएटिव्हमधून विकासकामांचे श्रेय वैज्ञानिक प्रक्रिया, प्रशासन आणि अभियांत्रिकीला देण्याची भूमिका मांडण्यात आली. अशा प्रकारे विकासकामांना चमत्काराचे स्वरूप दिल्यास प्रशासकीय आणि तांत्रिक कर्तृत्वाचे महत्त्व कमी होते, तसेच समाजात अंधश्रद्धेला खतपाणी मिळू शकते, असा अंनिसचा आक्षेप आहे.

संगमनेरकरांच्या जखमांवर मीठ चोळले

अंनिसच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनीही डॉ. विखे पाटील यांच्या विधानाचा निषेध केला. संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विखे पाटील सध्या लोकप्रतिनिधी नसले, तरी ते राजकारणी आणि डॉक्टर म्हणून समाजासमोर असतात. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचे विधान होणे निषेधार्ह असल्याचे अ‍ॅड. गवांदे यांनी म्हटले. त्यांनी या विधानाची तुलना संगमनेरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याशी केली. त्यामुळे शिर्डी-नाशिक रेल्वे मार्गाचा मुद्दा आता केवळ विकासकामापुरता मर्यादित न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन विरुद्ध ‘चमत्कार’ या भूमिकेच्या वादात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com