Ahilyanagar BJP district presidents demand : संगमनेरमधील राजकीय कीर्तनातील गोंधळानंतर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी कीर्तनात गोंधळ आणि हल्ला केल्याचा आरोप करत कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांनी 'नथूरामजी गोडसे' होण्याचा इशारा दिला आहे.
ही एकप्रकारे धमकीच असल्याचा आरोप थोरात समर्थकांकडून सुरू असतानाच, भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षकांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गेंकडे धाव घेत संग्रामबापू भंडारे महाराज यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीमागे मोठा राजकीय वास येऊ लागला आहे आणि थोरात संगमनेरसह जिल्हा आणि महाराष्ट्र कुणीतरी अस्थिर करू पाहत असल्याच्या आरोपांवर शिक्कामोर्तब होत असल्याचे निरीक्षक राजकीय विश्लेषक नोंदवू लागले आहेत.
भाजपचे (BJP) अहिल्यानगर जिल्ह्यातील शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांना संरक्षण देण्याची मागणी केली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
संग्रामबापू भंडारे महाराज यांचं घुलेवाडी (ता. संगमनेर) इथं चालू कीर्तनात काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांच्या समर्थकांनी गोंधळ निर्माण करून हल्ला केला. तसेच त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान केले. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी हिंदुत्वाच्या (Hindu) प्रखर विचारांवर केलेला हा हल्ला असून हे मोठे षड्यंत्र व सुनियोजित कट आहे, असा आरोप तिन्ही जिल्हाध्यक्षकांनी केला.
या हल्ल्यातील समाजकंटकांना तातडीने पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराजांच्या जीवास धोका दिसत असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी भाजपने निवेदनाद्वारे केली. संग्रामबापू भंडारे महाराज यांनी कीर्तनात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रतिपादन करत होते. तिथं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आले. चालू कीर्तनात गोंधळ घालत कीर्तन बंद पाडले. संग्रामबापू भंडारे महाराजांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. महाराजांच्या वाहनांवर दगड टाकून नुकसान केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हल्लेखोरांना अटक करून, त्यांचा धनी कोण? याचा छडा लावण्याची आवश्यकता असल्याचे भाजपने म्हटले आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयीन कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना चिथावणी देणाऱ्यांचा सुद्धा पर्दाफाश होणे आवश्यक असल्याचेही भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संग्रामबापू भंडारे महाराज यांनी कीर्तनात मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आरोप म्हणजे काय, खोटं कलमं लावणं, जामीन मिळणार नाही, अशी कलमं लावणं, बरचं काही तिथं नवीन घातलं गेलं. वस्तूस्थितीमध्ये तिथं अस काहीच घडलेलं नाही', असा दावा थोरातांनी केला.
'एक युवक उभा राहिला, तो महाराजांना असं म्हटला की, महाराज आपण अभंगावरती बोललं पाहिजे, एवढंच झालं. त्यावर मुलाविषयी त्याने केलेल्या वक्तव्यानं आणखी नाराजी वाढली, सायको आहे हा, अशा विधानानंमुळे कीर्तनात आणखी नाराजी पसरली. यानंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही. कीर्तन सोडून लोकं उठून गेली. यात त्यांच्यावर हल्ला कुठं झाला? कोणत्या गाडीची तोडफोड झाली? कोणत्या सोनसाखळी गेल्या? असे खोटे आरोप टाकून, या युवकांचा छळ करण्याचा पद्धतीशीर प्रकार सुरू, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.