Shivsena Vs Congress News: शहरातील नाशिक मध्य मतदार संघ हा महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे जागा वाटपात महाविकास आघाडीत स्पर्धा आहे. त्यात वरिष्ठ नेतेच अडून भसले आहेत.
हा मतदारसंघ पारंपारिक पाठिंबा देणाऱ्या अल्पसंख्यांक मतांच्या बळावर काँग्रेस पक्षाला सोपा वाटतो. या पक्षाकडे इच्छुकांची संख्याही भरपूर आहे. यामध्ये पक्षाचे प्रदेश सचिव राहुल दिवे आणि माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील हे प्रमुख इच्छुक आहेत.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यामुळेच या मतदारसंघाबाबत आग्रही आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जाते. यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघ हा वादाचा विषय ठरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
काँग्रेस पक्षाकडे प्रभावी उमेदवार नाही, असा शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा विषय केला आहे. याबाबत दोन वेळा चर्चा होऊनही खासदार राऊत यांनी या मतदारसंघाचा आग्रह सोडलेला नाही.
महविकास आघाडीत या मतदारसंघावरून जोरदार ओढाताण होत आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार आणि माजी महापौर वसंत गीते यांना उमेदवारी देण्याचा ठराव पक्षाने यापूर्वीच मंजूर केला आहे. तो वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आला आहे. पक्षाची सबंध यंत्रणा त्या दृष्टीने तयारीला लागली आहे.
माजी आमदार गीते यांच्यासाठी रोज विविध भागांमध्ये मिसळ पार्टीचे आयोजन केले जात आहे. त्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनाही आग्रहाने निमंत्रित केले जाते. या नेत्यांचीही त्याला हजेरी असते.
रविवारी माजी महापौर विनायक पांडे यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना नागरिकांची देखील मोठी हजेरी असेल अशी तयारी शिवसेनेचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची प्रचारातील आघाडी चर्चेचा विषय ठरली आहे.
काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट हिसकावून घेण्याच्या तयारीत आहे. तसे न झाल्यास पक्षीय पातळीवर उमेदवारांची देवाण-घेवाण करण्याचा प्रस्ताव देखील शेवटच्या क्षणी चर्चेला येऊ शकतो. एकंदरच नाशिक शहरातील नाशिक मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने अत्यंत प्रतिष्ठेचा केला आहे.
त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीत राजकीय धुसफूस आणि प्रचार दोन्ही जोरात आहे. शहरातील नाशिक मध्य मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा बनला आहे. विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी मिळणार की नाही, यावरून पैजा लागत आहेत. भाजपमध्ये सध्या अनेक इच्छुक तयार झाले आहेत.
भाजपच्या इच्छुकांनी देखील जोरदार फिल्डिंग लावली आहे. वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत रोज संपर्क होत आहे. त्यामुळे भाजपमध्ये जागा वाटपाबाबत निश्चितता आहे. विद्यमान आमदारांनाच उमेदवारी मिळते की अन्य इच्छुकांना लॉटरी लागते हे लवकरच स्पष्ट होईल.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.