Jamner Assembly Elections : भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना संकटात टाकणारं एक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांच्याच मतदारसंघात केलं आहे.
'2029 च्या विधानसभा निवडणुकीचं तिकीट गिरीश महाजन यांना आम्ही देणार नाही', असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला आम्ही तिकीट देऊ ज्याला गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मते मिळतील असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
भाजप (BJP) नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील नेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं लोकार्पण शुक्रवारी (ता.11) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं.
या कार्यक्रमा दरम्यान बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे 350 वं वर्ष आहे. या निमित्ताने जामनेर येथे शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला आहे. हा पुतळा आम्हाला स्वातंत्र्य काय असतं, स्वराज्य काय असतं, स्वाभिमान काय असतो ते दाखवून देत राहील.
तसंच ज्यांनी आम्हाला समता, बंधुता शिकवली आणि जगातील सर्वोत्तम संविधान दिलं अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा देखील येथे तयार झाला असून हा पुतळा आम्हाला बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण करून देत राहील. तर हे पुतळे उभारल्याबद्दल जामनेरकरांचं आणि मंत्री गिरीश महाजन यांचं मनापासून अभिनंदन करतो, असं फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी थेट महाजनांना 2029 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार नसल्याचं जाहीर केलं. ते म्हणाले, मंत्री गिरीश महाजनांना (Girish Mahajan) उमेदवारी देणार नाही. शिवाय यंदाच्या निवडणुकीत त्यांनी केवळ उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि महाराष्ट्रभर भाजपसह महायुतीचा प्रचार करावा. त्यानंतर थेट मतदानाच्या दिवशीच मतदारसंघात यावं आणि जामनेरकरांनी त्यास पाठिंबा द्यावा.
आपल्या सर्वांना माहिती आहे की महाजन हे आमचे संकटमोचक आहेत. मात्र, काही लोक म्हणताहेत की आम्ही त्यांना जामनेरमध्येच पाडणार. मात्र, ते अशक्य आहे. या मतदारसंघात गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं मिळवू शकेल अशी एकच व्यक्ती आहे, ती व्यक्ती म्हणजे आमच्या साधना वहिनी ( गिरीश महाजन यांचा पत्नी).
आम्ही साधना वहिनींना या मतदारसंघात उभं केलं तर त्यांना गिरीश महाजनांपेक्षा जास्त मतं मिळतील. त्यामुळे मी गिरीश महाजन यांना आज एक गोष्ट सांगेन. तुम्ही यावेळी लढून घ्या. परंतु, 2029 मध्ये साधना वहिनीच या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, तेव्हा आम्ही गिरीश महाजन यांना तिकीट देणार नाही." अशी मिश्किल टिप्पणी करत फडणवीसांनी थेट 2029 च्या निवडणुकीचा उमेदवार जाहीर केल्याचं पाहायला मिळालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.