Sharad Pawar, Balasaheb Thorat & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: गोंधळलेले संजय राऊत धुळे शहरासाठी कोणता डाव टाकणार?

Sampat Devgire

Dhule Constituency News: महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे राज्यातील अनेक मतदारसंघांबाबत शिवसेना ठाकरे गटात गोंधळाची स्थिती आहे. यामध्ये धुळे शहर हा एक प्रमुख मतदार संघ प्रमुख आहे.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीतील मतभेद आणि काँग्रेस आघाडीतील अंतर्गत वाद कायम आहे. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ यंदाही कायम राहील का? याचीच चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे.

आता समाजवादी पक्षाचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धुळे शहर मतदार संघात आयाराम, गयाराम यांचे प्राबल्य राहते की निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाते, यावर सध्या इच्छुकांमध्ये पैजा लागण्याची स्थिती आहे.

शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी काल धुळे विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांचे चर्चा केली. यावेळी शहरप्रमुख डॉ सुशील महाजन, धीरज पाटील, भरत मोरे, कैलास मराठे, कपिल लिंगायत आदींनी खासदार राऊत यांच्याशी चर्चा केली.

या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फ्रेश चेहरा देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ आपला परंपरागत मतदारसंघ आहे, असा दावा केला आहे. त्यात भर म्हणून समाजवादी पार्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सख्य असलेल्या इर्षाद जहागीरदार यांना उमेदवारीची घोषणा केली आहे.

मुळातच येथे `एमआयएम` पक्षाचे फारुक शेख विद्यमान आमदार आहेत. त्यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. गेले दोन वर्ष महापालिकेत सतत्ते असलेल्या भाजपशी आमदार शेख यांच्यात आरोप, प्रत्यारोप पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाने भाजप विरोधात संघर्ष केला.

या सर्व राजकीय संघर्षात माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या गटाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी धडपड केली आहे. अशा स्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा मतदार संघ घ्यावा की नाही यावर खल सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार कोण? यापासूनचा गोंधळ यंदाही कायम आहे.

शिवसेनेने गेल्या निवडणुकीत हिलाल माळी यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. पक्षाने त्यांच्या मागे ताकद उभी केली. मात्र स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यापासून दुरावले.होते. भाजपने देखील शिवसेनेच्या उमेदवाराचे आंतरराखूनच काम केले.

या सगळ्यांचा परिणाम म्हणजे `एमआयएम`चे शेख यांना या गोंधळाचा लाभ झाला. शिवसेनेचे हिलाल माळी चौथ्या स्थानावर राहिले. त्यामुळे यंदा तरी खासदार राऊत धुळे शहर मतदार संघासाठी मनापासून दावा करतील का? याची आता प्रतीक्षा आहे.

शिवसेनेकडे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार प्रा शरद पाटील हे एक प्रमुख उमेदवार आहेत. शहर प्रमुख डॉ सुशील महाजन, धीरज पाटील, भरत मोरे यांसह अन्य काही इच्छुकांनी देखील राऊत यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

खासदार राऊत यांनी मात्र आपल्याला धुळे मतदार संघाचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे धुळे शहर मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील राजकीय ओढाताण आगामी काळात अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गटाला यंदा तरी स्पष्ट भूमिका घेता येईल का? याचीच स्थानिक नेत्यांत चर्चा आहे.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT