Ahmednagar News : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत.त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.अशातच राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजातील आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मोठा लढा उभारल्यानंतर आता धनगर समाजही आरक्षणासाठी चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यातच आता नगरमधील नेवासा तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे.
राज्यातील महायुती सरकारकडून आंदोलनाची दखल घेत जात नसल्याने धनगर (Dhangar) समाजातील काही आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिला होता.यातच आता नेवासा फाटा येथे गेल्या 9 दिवसांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी उपोषण सुरु आहे.पण या आंदोलनातील दोन आंदोलक उपोषणस्थळावरून बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यातील धनगर समाजाने एसटी आरक्षणाची (Reservation) अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाचं अस्त्र उपसलं आहे.या मागणीसाठी महाराष्ट्रभर जोरदार वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करण्यात येत आहे. अशातच ही धक्कादायक घटना समोर आल्याने धनगर समाज राज्य सरकारविरोधातल्या आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे.
नेवासा फाटा येथील उपोषणस्थळावरुन गुरुवारी(ता.26) दोन आंदोलक बेपत्ता झाले आहेत. प्रल्हाद सोरमारे व बाळासाहेब कोळसे असे या आंदोलकांची नावे आहेत.हे दोन्ही आंदोलकांसाठी परिसरात जोरदार शोधमोहीम राबवली जात आहे.
यातच आता प्रवरासंगम येथील गोदावरी नदीकाठी एक चिठ्ठी आढळून आली आहे.त्या चिठ्ठीत आम्ही जलसमाधी घेत आहोत. यास सर्वस्वी सरकार जबाबदार असा मजकूर लिहिल्याचं समोर आलं आहे. यामुळे उपोषणकर्त्यांसह धनगर समाजात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
प्रल्हाद सोरमारे व बाळासाहेब कोळसे या दोघांच्या शोधासाठी धनगर समाजासह प्रशासनाकडून युध्दपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. तसेच त्यांचे फोनही 'नॉट रिचेबल' आहेत. प्रवरासंगम येथील गोदावरी नदीच्या पुलावर चपलाही सापडल्या आहेत. यामुळे या दोन आंदोलकांनी सरकारच्या उपोषणाकडील दुर्लक्षामुळे नदीत उडी घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
धनगर आरक्षणासाठी नेवासा येथे नऊ दिवसांपासून उपोषण सुरू होते. यात छत्रपती संभाजीनगरमधील प्रल्हाद सोरमारे, तर पाथर्डीमधील बाळासाहेब कोळसे यांनी प्रवारासंगम पुलावरून गोदावरी नदी पात्रात उड्या घेतल्या. सोरमारे आणि कोळसे नदीतील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या शोधासाठी पुण्यावरून एनडीआरएफचे दल पाचारण करण्यात आले आहे.
धनगर समाजातील आंदोलक अधिकच आक्रमक झाले असून रास्ता रोको आंदोलन गेल्या तीन तासांपासून सुरू आहे. सोरमारे आणि कोळसे हे आंदोलनामधील मुख्य उपोषण करते होते. त्यांनीच नदीपात्रामध्ये पुढे घेतल्याने धनगर समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. आंदोलन आक्रमक झाल्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे
यापूर्वी आदिवासी आमदार हिरामण खोसकर यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यांनी सरकारने धनगर आणि धनगडवरील आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही 15 आदिवासी आमदार सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकू अशी संतप्त प्रतिक्रियाही आमदार खोसकर यांनी दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.