Sanjay Raut & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut: `अजित पवारांनी स्वतःच्या जमिनी विकून लाडक्या बहिणींना पैसे दिले काय?`

Sanjay Raut criticizes Ajit Pawar: शिवसेना नेते संजय राऊत महायुतीच्या नेत्यांवर भडकले, कोल्हापूरच्या संजय मंडलिक यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला

Sampat Devgire

Maharashtra Election 2024: निवडणूक प्रचार आणि नेत्यांच्या सभांतील वक्तव्य वादाचा विषय ठरू लागली आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीचे नेते विविध दावे करतात. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत चांगलेच भडकले.

लाडकी बहीण योजनेबाबत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात विविध दावे केले जात आहेत. या योजनेचे सारे श्रेय हे नेते घेऊ पाहत आहेत. त्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःच्या जमिनी विकून लाडक्या बहिणींना पैसे दिले आहेत काय? असा संतप्त सवाल खासदार राऊत यांनी केला.

कोल्हापूर येथे भाजपचे खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेसच्या प्रचारातील महिलांबाबत भाषणातून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. संजय मंडलिक यांनी आतापर्यंत किती पक्ष बदलले आणि कोणा कोणाच्या वरचणीला ते बसले याचा इतिहास काढून पहावा लागेल. महिलांना धमक्या देणे, दबाव टाकणे हे मंडलिक यांना शोभत नाही. असेही ही योजना महायुतीने केवळ निवडणुकीसाठीच आणली आहे. त्यामुळे अशा धमक्यांना कोणीही भीक घालू नये, असे खासदार राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीच पुढे नेणार आहे. आगामी काळात आमचीच सत्ता येणार आहे. त्यासाठी आम्ही पंचसूत्री जाहीर केली आहे. महालक्ष्मी योजनेअंतर्गत खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान केला जाईल. त्यांना दरमहा 3000 रुपये देण्याची योजना आहे, असे राऊत यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शरद पवार यांना टीकेचे लक्ष करीत आहेत, असे करणे उपमुख्यमंत्री पवार यांना योग्य वाटते का? असा प्रश्न राऊत यांनी केला. आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वास फक्त शरद पवार यांच्यावरच आहे. तेच सध्या जनतेसाठी काम करीत आहेत. शरद पवार यांनी सगळ्यांना कामाला लावले आहे. आम्हाला सक्रिय केले आहे. महायुतीचे कोणीही नेते सत्ते पलीकडे पाहण्यास तयार नाहीत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन 17 नोव्हेंबरला आहे. यानिमित्त शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकावर पहाटेपासूनच हजारो चाहत्यांची गर्दी होते. समाजाचे विविध घटक त्यांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे या दिवशी शिवसेना ठाकरे पक्षाकडून सभा होत असते. या सभेमुळे या ठिकाणचा गर्दीचा ओघ वाढू शकतो. सरकार त्यात अडथळा आणू शकते. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष ठरल्याप्रमाणे आपला कार्यक्रम करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT