Jalgaon Politics: जळगावच्या सत्ताधारी नेत्यांनी काल महामार्गाच्या टोल वसुलीला चांगलाच झटका दिला. त्यामुळे यावरून आता नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. मंत्र्यांनीच टोल नाकारा असा इशारा दिला आहे.
महामार्गावरील नशिराबाद येथे टोल वसुली केली जाते. मात्र या रस्त्यावर अनेक कामे अपूर्ण आहेत. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. वाहतुकीला अनेक अडचणी आणि अडथळे येतात. वारंवार इशारा देऊनही त्यावर काम झालेले नाही.
जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची सभा शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला प्रामुख्याने सत्ताधारी पक्षाचे विविध आमदार आणि प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे चांगलेच आक्रमक झाले.
रेल्वे रस्ते व अन्य समस्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावेळी तक्रारी केल्या. त्यावर वस्त्रोद्योग मंत्री सावकारी यांनी मलाही असाच अनुभव येत आहे. वारंवार संबंधितांना सूचना केल्यावरही कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे आता त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत थेट नशिराबाद येथील टोल नाकारण्याचा शासकीय ठराव करण्यात आला. अशा प्रकारे टोल नाकारण्याचा झालेला हा पहिलाच ठराव असावा. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे. सत्ताधारी पक्षाकडूनच टोलला नकारघंटा दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
टोल नाकारण्याच्या ठरावामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र प्रत्यक्षात टोल वसुली थांबेल का हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या बैठकीला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील, जिल्हाधिकारी अतिश प्रसाद यांचे विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
नशिराबादच्या टोल वसुलीवरून नागरिकांनी यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या. महामार्गावर रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. टोल साठी अपेक्षित असलेल्या अनेक सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. असे असतानाही ही टोल वसुली सुरू होती. त्यामुळे आता या टोल वसुलीला राजकीय नेत्यांनी चांगलाच धक्का दिला आहे. यावरून आता नवा राजकीय बाद निर्माण होतो की टोल वसुली थांबते याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.