MLA Saroj Ahire On Vijay Karanjkar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire : बघून घेईल, करुन घेईल या धमक्या तुमच्या घरात ज्या पाणी भरता त्यांना द्या, सरोज अहिरेंनी करंजकरांना फटकारलं..

MLA Saroj Ahire On Vijay Karanjkar : भगूर नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विजय करंजकर व आमदार सरोज अहिरे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. काल अजित पवारांसमोरच सरोज अहिरेंनी तुफान फटकेबाजी केली.

Ganesh Sonawane

Nashik Politics : बघून घेईल करुन घेईल, सोडणार नाही या पोकळ दमक्या तुमच्या घरात ज्या पाणी भरता ना त्यांना द्यायच्या. आपण आपल्या बापाला सोडून कुणाच्या बापाला घाबरत नाही. माझा राजकीय दादा गॉडफादर (अजितदादा) इथे बसला आहे. त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही. या भाषेत राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी शिवसेनेचे नेते विजय करंजकर यांना सुनावलं.

भगूर नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते विजय करंजकर व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्यात मोठा वाद उफाळला आहे.

विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर या भगूर नगरपालिकेत शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. सरोज अहिरे यांनी करंजकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांना उभे केले आहे. करंजकर यांना भगूरच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरोज अहिरे यांनी कंबर कसली असून राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना ठाकरे गटालाही आपल्यासोबत घेतलं आहे.

करंजकर यांची २० वर्षांपासून भगूरनगरपालिकेत सत्ता आहे. पण आता सरोज अहिरे यांनी करंजकर यांच्याविरोधात मैदानात उतरत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे करंजकर व अहिरे यांच्यातील वाद वाढला असून प्रचारादरम्यानही दोघांकडून एकमेकांवर टोकाची टीका झाली.

सरोज अहिरे यांनी भगूरचा विकास मला वॉटर, मीटर व गटरच्या पलीकडे घेऊन जायचा आहे असं म्हणत करंजकर यांच्या कारभारावर टीका केली होती. सरोज अहिरेंनी प्रेरणा बलकवडे यांना निवडून देण्यासाठी मतदारांना आव्हान केलं. त्याचाच राग येऊन करंजकर यांनी एका भाषणात सरोज अहिरे यांच्यावर टीका करताना त्यांच्या बापाचा उल्लेख केला होता.

करंजकर यांनी बापाचा उल्लेख केल्याने सरोज अहिरे यांच्या मनात प्रंचड राग होता. काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांची सभा भगूरमध्ये झाली. या सभेत सरोज अहिरे यांनी करंजकर यांचा चांगलाच समाचार घेतला. अजित दादांसमोरच त्यांनी करंजकर यांना आव्हान दिलं.

सरोज अहिरे म्हणाल्या माझा व्हाट्सअप नंबर नोट करुन घ्या. असं सांगत भरसभेत त्यांनी आपला नंबर सांगितला. लोकेशन सेंड करा , या बापाची लेक तिथे हजर होऊन जाईल. एकटी येईल असे चॅलेंज त्यांनी करंजकर यांना भरसभेत अजित पवार यांच्यासमोरच दिले.

कर नाही त्याला डर नाही. मी चूक केलेली नाही म्हणून मी घाबरत नाही. माझी आई इथे बसली आहे. तीला पोरांनी करंजकर यांचा व्हिडीओ दाखवला. ती रडायला लागली. म्हणाली काय चाललयं सरोज, का लोक असं करताय, तुझ्या वडिलांनी चांगलं काम केलं तरी का त्यांच्यावर टीका करताय. तू एकटी फिरू नको तूला धमक्या दिल्या जाता आहेत असे आई मला म्हणाली.

सरोज अहिरे म्हणाल्या पण मी आईला सांगितलं, आई घाबरु नको, तू आई म्हणून मला जन्म दिला. माझा बाप स्वर्गवासी झाला पण ही मायबाप जनता माझे पालनपोषण करत आहे. माझं संरक्षण करत आहे. तू घाबरु नको. त्यामुळे इथून पुढे सगळं करायचं पण बापाचं नाव काढायचं नाही. कारण माझा बाप काढायची तुमची लायकी नाही असं त्यांनी करंजकर यांना सुनावलं.

आणि करंजकर म्हणतात ना मी अनेकांची वाट लावून इथपर्यंत आलोय. ज्यांची तुम्ही वाट लावली ना मतदानाच्या दिवशी बघ ते लोक तुमची कशी वाट लावतात असही सरोज अहिरे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT