Gokul Milk Union: गोकुळमधील सत्तासंघर्ष आता नव्या वळणावर पोहोचला आहे. अध्यक्ष निवडीच्या सभेत महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिल्याने गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाली. या घडामोडींवरून आमदार सतेज पाटील यांनी आता थेट पत्रकारांनाच पत्र लिहिले आहे. ‘गोकुळमध्ये जे घडत आहे, त्याचे वास्तव जनतेसमोर मांडा आणि साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज बना,’ असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे.
पत्राच्या सुरुवातीलाच सतेज पाटील यांनी सहकार चळवळीच्या संस्थापकांच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची निःस्वार्थ सेवा, डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे नियोजन आणि वैकुंठभाई मेहता यांची नैतिक शिस्त यांतून महाराष्ट्रात सहकार उभा राहिला. शेतकरी हाच संस्थेचा खरा मालक असावा, हेच या सर्वांचे स्वप्न होते. मात्र, आज गोकुळच्या माध्यमातून सहकाराच्या याच गाभ्यावर घाला घातला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले, "कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी 'गोकुळ'च्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागांवर समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र २९ ऑक्टोबरच्या अध्यक्ष निवड सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक ठरवून गैरहजर राहिले आणि गणपूर्तीच्या तांत्रिक कारणावर सभा तहकूब झाली. पराभव मान्य करण्याऐवजी प्रक्रियाच अडवण्याचा हा प्रकार आहे".
"जनतेचा कौल तांत्रिक कारणांनी रोखला जात असेल, तर मतदानाला अर्थ काय उरतो? केवळ गोकुळमधील बहुमतासाठी कायदा बदलण्याची किंवा शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ फिरवण्याची चर्चा होत असेल, तर मग निवडणुका घ्यायच्याच कशाला? आज गोकुळसाठी आणलेला असाच कायदा उद्या महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही येऊ शकतो आणि स्वीकृत सदस्यांमार्फत लोकशाहीची गळचेपी केली जाऊ शकते. मग लोकांनी दिलेल्या कौलाला काय अर्थ राहतो"? असे सतेज पाटीलांनी सांगितले.
प्रशासकीय काळात गोकुळचा तोटा वाढत असताना आणि दुष्काळ व चाऱ्याच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची गरज असताना लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात नसणे, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. विरोधी संचालकांनाही शेतकऱ्यांचा कौल स्वीकारून पुढील सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
“आम्ही कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने लढणार आहोतच. मात्र, आज गोकुळमध्ये जे घडत आहे, ते उद्या कोणत्याही संस्थेत घडू शकते. महाराष्ट्रातील सहकाराचा वारसा जपण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी गोकुळच्या साडेपाच लाख शेतकऱ्यांचा आवाज बनून तुम्ही जनतेसमोर वास्तव मांडा,” अशी कळकळीची विनंती सतेज पाटील यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.