

Karad, 03 November : लोकनेते (स्व.) बाळासाहेब देसाई यांच्या कृपा-आशीर्वादाने तब्बल ४५ वर्षांनंतर देसाई परिवाराचा सदस्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात दाखल झाला आहे. देसाई गटाचे दोन संचालक बँकेत निवडून आल्याने मनापासून आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगतानाच त्यांचा ऊर भरुन आला.
सातारा जिल्हा बॅंकेतील विजयानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई हे माध्यमांशी बोलत होते. मंत्री देसाई यांचे बंधू रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, लोकनेते (स्व.) बाळासाहेब देसाई यांनी स्थापन केलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पहिले अध्यक्षही तेच होते. त्यांच्या पश्चात आज इतक्या वर्षांनंतर देसाई परिवाराचा सदस्य बँकेत दाखल झाला आहे. (स्व.) शिवाजीराव देसाई यांच्यानंतर जवळपास ४५ वर्षांनी आम्ही जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे. केवळ मी एकटाच नव्हे, तर आमच्या गटाच्या मंगल पाटील याही बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.
पहिल्यांदाच देसाई गटाचे दोन संचालक जिल्हा सहकारी बँकेत दाखल झाले आहेत. महिला संचालकाच्या रूपानेही बँकेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. मान-सन्मानाने आणि अभिमानाने आम्ही बँकेत प्रवेश केला असून, याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे सर्वप्रथम मी आभार मानतो. निवडणूक लागल्यापासून माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी जी मेहनत घेतली, ठामपणे साथ दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
अनेक बाजूंनी प्रयत्न झाले. पण, कोणत्याही गोष्टीला न जुमानता देसाई परिवारावर विश्वास ठेवून मतदारांनी आम्हाला साथ दिली. माझ्यासाठी मेहनत घेणाऱ्या, कष्ट करणाऱ्या आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता देसाई परिवारावर ठाम विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे तसेच, देसाई गटाच्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.