Sangamner Politics : संगमनेर नगरपालिकेवर एकहाती सत्ते आणलेले आमदार सत्यजीत तांबे यांनी, शहरातील विविध कामांचा आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कौतुक आणि आभार मानत, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचे नाव न घेता श्रेयवादावरून चांगलेच सुनावले.
संगमनेर शहरात उभारलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियातून धडपड सुरू असल्याचे सांगून, दुसऱ्यांनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात आमदार तांबे यांनी सुनावले.
आमदार सत्यजीत तांबे यांनी, संगमनेर (Sangamner) शहरात उभारलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी संपूर्ण निधी जिल्हा नियोजन समिती मंडळातून मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे यासाठी सहकार्य केले. त्यांचे आभार! मात्र विरोधकांनी या कामाचे श्रेय घेण्यास सुरूवात केली आहे. पाठपुरावा केला, निधी आणला, हे सोशल मीडियातून सांगायला सुरूवात केली आहे. पण निधी कसा मिळाला, हे सांगून त्यांच्या दाव्याची हवाच काढून घेतली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जो निधी दिला जातो, तो नगरपालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिला जातो. त्या निधीवर नगरपालिकेच्या, त्या गावच्या लोकांचा अधिकार असतो. तो कोणाच्या शिफारशीवर मिळत नाही. मिळालेल्या निधीतून आम्ही, सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा उभी करून महिलांच्या, मुलीच्या सुरक्षितेवर भर दिला आहे. हे जिल्हा नियोजन समिती मंडळाला स्पष्ट केल्याचे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी सांगितले.
रक्षा दलाला आता या सीसीटीव्ही यंत्रणेची साथ मिळणार आहे. त्यामुळे संगमनेरमधील महिला-मुली सुरक्षिततेला अधिक बळ मिळाले आहे. हा निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी खूप मोठी मदत केली, यासाठी त्यांचे जाहीर आभार मानतो. पण दुसऱ्या-तिसऱ्या कोणींनी श्रेय घेऊ नये, जे काम त्यांनी केले, त्याचे श्रेय त्यांनी घ्यावे, जे आम्ही केले, त्याचे श्रेय आम्हीच घेणार, असे सत्यजीत तांबे यांनी आमदार खताळ यांचे नाव न घेता खडसावले.
जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर आहे. विखे पाटील-थोरात यांच्या छुप्या आघाडीच्या चर्चांना तोंड फुटले आहे. तसे वृत्त देखील समोर येत आहे. दोन्ही बाजूने दुजोरा नसला तरी, चर्चांना तोंड फुटले आहे. यातच सत्यजीत तांबे यांनी संगमनेर होम ग्राऊंडवरून थोरातांच्या उपस्थितीत मंत्री विखे पाटील यांचे कौतुक आणि आभार केल्याने, आगामी काळात विखे पाटील-थोरात जिल्हा बँकेच्या राजकारणात सहमीत एक्स्प्रेस धावणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.