Satyajeet Tambe Latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Graduate Election : सत्यजीत तांबे यांच्या विजयात 'हे' घटक ठरले महत्वाचे

Satyajit Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय

Ganesh Thombare

Nashik Graduate Election : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर सत्यजीत तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.

याच पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांच्या विजयाची कारणे काय आहेत? तसेच त्यांच्या विजयामध्ये कुणाचा महत्वाचा वाटा आहे, त्यांच्या विजयामध्ये कोणते घटक महत्वाचे ठरले? याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात..

सत्यजीत तांबे यांच्या विजयाची पाच कारणे कोणती?

१) डॉ.सुधीर तांबे या मतदार संघातून तीन टर्म आमदार

सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ.सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघातून तब्बल तीन टर्म आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा या मतदारसंघावर चांगला प्रभाव राहिला आहे. ते आमदार असल्याने त्यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.

त्यामुळे या सर्व कामांचा त्यांना या निवडणुकीमध्ये फायदा झाला. तसेच डॉ.सुधीर तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये वैयक्तीक मोठा जनसंपर्क आहे. यामध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यात तांबेंना माणनारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांच्या जनसंपर्काचा फायदा सत्यजीत तांबेंना झाला असल्याचे दिसून येत आहे.

२) मोठी मतदार नोंदणी आणि प्रभावी प्रचार यंत्रणा

सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ.सुधीर तांबे हे सलग तीन वेळा आमदार आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनामुळे सत्यजीत तांबे यांचा विजय सोपा झाला. त्यातच त्यांनी पदवीधरांची मोठी मतदार नोंदणी केली होती. तसेच निवडणुकीमध्ये प्रभावी प्रचार यंत्रणा देखील त्यांच्याकडे दिसून आली. त्यामुळे त्यांना या सर्व यंत्रणेचा मोठा फायदा झाला.

३) प्रत्येक जिल्ह्यात स्वत:ची यत्रंणा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यामध्ये सत्यजीत तांबे यांची स्वत:ची यत्रंणा कार्यरत होती. त्यामुळे त्यांना प्रचार करण्यासाठी आणि त्या-त्या जिल्ह्यातील प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मदत झाली. तसेच सत्यजीत तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे नेटवर्क चांगले होते. यावेळी त्यांना त्या नेटवर्कचा देखील मोठा फायदा झाला.

४) पाचही जिल्ह्यात भाजपचा छुपा पाठिंबा

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार जाहीर केला नाही. पण अखेरपर्यंत भाजपने कुठल्याही उमेदवारास पाठिंबाही जाहीर केला नाही. सत्यजीत तांबे यांना भाजप अधिकृत पाठिंबा देईल अशी चर्चा होती.

मात्र, शेवटपर्यंत भाजपने अधिकृत पाठिंबा दिला नाही. तर निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला. तसेच या मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात भाजपचा तांबेंना छुपा पाठिंबा राहीला. त्यामुळे तांबेंच्या विजयामध्ये भाजपचा देखील महत्वाचा वाटा महत्वाचा आहे.

५) काँग्रेसमधील एका गटाचा पाठिंबा

पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र, त्यानंतरही काँग्रेसमधील एका गटाने तांबेंना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील काही पदाधिकारी होते. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्या विजयामध्ये काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा देखील महत्वाचा वाटा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT