सुशील थोरात
Clara Bruse Girls High School in Ahilyanagar : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले, ती अहिल्यानगरमधील ऐतिहासिक 'क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल' आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. दोनशे वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या या शाळेतील शिक्षकांचे पटसंख्येअभावी अन्य शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. त्यातच आता शाळेचा 'यू-डायस क्रमांक' बंद करण्याची कार्यवाही करण्याचे पत्रही शिक्षण विभागाने महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक शाळा वाचवण्यासाठी संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थिनी आणि माजी विद्यार्थिनींनी सरकारला साद घातली आहे.
अमेरिकन मराठी मिशनने १८१३ मध्ये अहिल्यानगरमध्ये क्लेरा ब्रुस शाळेची स्थापना केली होती. स्त्री शिक्षणाच्या इतिहासात या शाळेला विशेष महत्त्व आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच शाळेत शिक्षण घेतले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शाळेची पटसंख्या कमी होत असल्याचे कारण देत शिक्षण विभागाकडून शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्यात येत आहे.
शिक्षकांना दुसऱ्या शाळेत हजर होण्याचे आदेश
अहिल्यानगरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी चार नोव्हेंबर रोजी पत्र जारी करून क्लेरा ब्रुस शाळेतील शिक्षकांना समायोजन करण्यात आलेल्या शाळांमध्ये तातडीने हजर होण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित शिक्षक रुजू न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नसल्याचे नमूद करत येथील विद्यार्थिनींना अन्य शाळांमध्ये प्रवेश देण्याची आणि शाळेचा यू-डायस क्रमांक बंद करण्याची कार्यवाही करण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यामुळे शाळेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिक्षण विभागाच्या पत्रात शिक्षक नाहीत; प्रत्यक्षात वर्ग सुरूच!
शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू असली, तरी प्रत्यक्षात या शाळेत आजही विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत आहेत. काही शिक्षिका विनावेतन विद्यार्थिनींना शिकवण्याचे काम करत आहेत. शाळेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत शाळा बंद पडलेली नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.
शाळेतील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि हा ऐतिहासिक वारसा जपला जावा, यासाठी शिक्षिका प्रयत्न करत आहेत. विनावेतन अध्यापन करणाऱ्या शिक्षिका स्मिता नाईक यांनीही ही शाळा बंद करू नये, अशी विनंती शिक्षण विभागाकडे केली आहे.
'शाळा बंद करण्याचा डाव'; संस्थाचालकांचा गंभीर आरोप
क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल चालवणाऱ्या मराठी मिशन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विजया जाधव यांनी शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शाळेत आजही विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शिक्षक त्यांना शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना काही व्यक्ती आणि शिक्षणाधिकारी यांनी मिळून ही शाळा बंद पाडण्याचा डाव आखल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी साम टीव्हीशी बोलताना केला आहे.
शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर शाळा चालवायची कशी, असा प्रश्न संस्थेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी संस्थाचालकांसह माजी विद्यार्थिनींनी केली आहे.
ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकार पुढाकार घेणार का?
ज्या सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्याच सावित्रीबाईंना घडवणाऱ्या शाळेला आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शाळेची घटलेली पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करता येतील का? ऐतिहासिक वारसा असलेल्या या शाळेसाठी सरकार विशेष धोरणात्मक निर्णय घेऊ शकते का? शिक्षकांचे समायोजन करण्याऐवजी शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करता येतील का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.